शिरपूर । शिरपूर तालुक्यातील तर्हाड कसबे येथील विजय सरदार गिरासे या रूग्णास उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उत्तर महाराष्ट्राचे भाजपा वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ.जितेंद्र ठाकूर यांच्या प्रयत्नाने एक लाख रूपयाचा निधी मंजूर झाला.तर्हाड कसबे येथील विजय गिरासे व त्याचा भाऊ भुषण गिरासे हे दोघे शेतात फवारणी करून घरी आले असता.त्यांना मळमळ व उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तातडीने शिरपूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतांना यातील भुषण गिरासेचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे गिरासे कुटूबियांनी डॉ.जितेंद्र ठाकूर यांच्याकडे संपर्क साधला. तातडीने विजय गिरासेला धुळे येथे सिद्धेश्वर हॉस्पीटल येथे दाखल केले.
विजयच्या उपचारांवर विशेष लक्ष
डॉ.जितेंद्र ठाकूर यांनी विजयच्या उपचारांवर विशेष लक्ष देत,त्याला अतिदक्षता विभागात 15 दिवस ठेवले. यावेळी डॉ.जितेंद्र ठाकूर यांनी कुटूंबियांना पैशांची काळजी न करण्याचे सांगितले. यामुळे पैसे नसतांनाही विजयवर चांगले उपचार झाले व प्राण वाचले. डॉ.ठाकूर यांनी मुंबई येथे सतत पाठपुरावा करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सुमारे एक लाख रूपये मंजूर करून आणले.तर्हाड कसबे गावी जावून डॉ.जितेंद्र ठाकूर यांनी विजय गिरासे यास गावातील भाजपा पदाधिकारी हेमराज पाटील, योगेश पाटील यांच्यासोबत पंचायत समिती सदस्य ब्रिजलाल मोरे, मिलिंद पाटील, प्रफुल पाटील, विजय पाटील, योगेश राजपूत, धनराज मोखे, शाम पाटील यांच्या हस्ते धनादेश दिला. डॉ.जितेंद्र ठाकूर यांनी ही केलेली लाख मोलाची मदत व सर्वसामान्यांसाठी करत असलेल्या कामाबद्दल गावातील लोकांनी डॉ.जितेंद्र ठाकूर यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी गावातील तरूण व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.