पिंपरी-चिंचवड : अनेक नाट्यमय घडामोडीनंतर भारतीय जनता पक्षाकडून पिंपरी-चिंचवड महापालिका स्वीकृत नगरसेवकपदासाठी पक्षाचे संघटन सरचिटणीस बाबू नायर, सरचिटणीस माऊली थोरात, मोरेश्वर शेडगे यांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दुपारी साडेचारच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तिघांचे अर्ज दाखल करून घेण्याच्या सूचना सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांना केल्या. त्यानंतर या तिघांनी अर्ज दाखल केले. या तिघांना संधी देऊन मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय दिला आहे. तर आपल्या समर्थकांची वर्णी लागावी यासाठी पक्षाच्या आमदारांनी लावलेली फिल्डिंग अपयशी ठरली आहे. या आमदारांना मुख्यमंत्र्यांनी कात्रजचा घाट दाखविला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर आणि संजय वाबळे यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पक्षाचे नेते अजित पवार यांच्या सूचनेनुसार भोईर आणि वाबळे यांचा अर्ज दाखल केला असल्याचे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी सांगितले. मे महिन्यातील सर्वसाधारण सभेत त्यांच्या नावावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब होणार आहे.
आ. जगतापांची कामतेकर, आ. लांडगेंची योगेश लांडगेंसाठी फिल्डिंग?
स्वीकृत सदस्यपदासाठी भाजपकडून अमर मूलचंदानी, सारंग कामतेकर, अॅड. मोरेश्वर शेडगे, योगेश लांडगे, अमोल थोरात, महेश कुलकर्णी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. शहरातील नेत्यांचे यापैकी तीन नावांवर एकमत होत नव्हते. त्यामुळे स्वीकृत सदस्य निवडीचा निर्णय राज्य नेतृत्वाकडे सोपविला होता. पहिल्यांदा एक वाजता नावे जाहीर करु असे सांगितले. त्यानंतर पाच वाजेपर्यंत वेळ घेतला होता. दोन्ही आमदारांनी आपआपल्या समर्थकांसाठी जोरदार दबाव निर्माण केला. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दबावाला न जुमानता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी देण्याची भूमिका घेतली. पक्षाचे संघटन सरचिटणीस माऊली थोरात, बाबू नायर आणि मोरेश्वर शेडगे यांना संधी देऊन पक्ष संघटनेलाच पक्षाने महत्त्व दिल्याचे अधोरेखित केले आहे. महापालिका निवडणुकीत पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी या तिघांनाही उमेदवारी दिली नव्हती. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आमदार लक्ष्मण जगताप यांनी सारंग कामतेकर तर आ. लांडगे यांनी योगेश लांडगे यांच्यासाठी जोरदार ‘फिल्डिंग’ लावली होती. माऊली थोरात हे खासदार अमर साबळे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. तर, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन यांचे कट्टर समर्थक म्हणून बाबू नायर यांना ओळखले जाते. मोरेश्वर शेडगे यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनीच स्वीकृतपदी संधी देण्याचा शब्द दिला होता.
बंडखोरीमुळे प्रशांत शितोळेंची संधी हुकली?
महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला गळती सुरू असताना भाऊसाहेब भोईर यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तसेच काँग्रेसमध्ये असतानाही त्यांची राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर निष्ठा होती. तर, संजय वाबळे हे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांचे खंदे समर्थक आणि मूळचे बारामतीकर आहेत. त्यामुळे त्यांची स्वीकृत सदस्यपदी वर्णी लागली असल्याचे बोलले जाते. प्रशांत शितोळे यांनी स्वीकृत सदस्यपदी घेण्याची मागणी अजितदादांकडे केली होती. परंतु, शितोळे यांनी महापालिका निवडणुकीत बंडखोरी केल्यामुळे त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांना संधी दिली असती तर बंडखोरांना संधी दिल्याचे संदेश बाहेर गेला असता. त्यामुळे त्यांना संधी दिली नसल्याचे योगेश बहल यांनी सांगितले.
गटनेत्यांच्या बैठकीत दिली नावे….
पाच स्वीकृत नगरसेवक निवडण्यासाठी मंगळवारी (दि. 9) प्रशासनाला नावे कळविण्याची मुदत होती. त्यानुसार महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्व गटनेत्यांची बैठक बोलाविली होती. यावेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, नगरसचिव उल्हास जगताप आणि महापालिकेचे कायदा सल्लागार उपस्थित होते. पक्षीय बलाबलानुसार, एकूण पाच जणांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करता येते. भाजपच्या नगरसेवकांची संख्या 77 असून, पक्षाला पाच अपक्षांचाही पाठिंबा आहे. त्यामुळे महापालिकेत भाजपचे एकूण संख्याबळ 82 होते. त्यामुळे नगरसेवकांच्या संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवकांच्या तीन जागा भाजपच्या वाट्याला येतात. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 36, शिवसेनेचे 9 आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक नगरसेवक आहे. त्यामुळे उर्वरित दोन जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येतात. शिवसेना आणि मनसेचे संख्याबळ अपुरे असल्याने या दोन्ही पक्षाच्या वाट्याला एकही स्वीकृत नगरसेवकपद येत नाही.