मुंबई – घाटकोपर येथे झालेल्या विमान दुर्घटनेत पाच जणांना जीव गमवावा लागला असून यात आणखी धक्कादायक माहिती सोर आली आहे. अपघातातील हे हेलिकॉप्टर ‘यु वाय कंपनी’चे होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर गडचिरोली दौऱ्यात दुर्घटना होता-होता वाचलेले हेलिकॉप्टरदेखील ‘यु वाय एव्हिएशन कंपनी’चेच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या कंपनीवर लवकरच कारवाई होणार आहे.
केंद्रीय स्तरावर कारवाई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शासकीय हेलीकॉप्टर उपलब्ध नसल्यास अनेकदा यु वाय सह अन्य कंपन्यांची हेलिकॉप्टर वापरली जातात. मात्र यु वाय कंपनीच्या चार्टर विमान आणि हेलिकॉप्टरचा अनुभव चांगला नसल्याचेही मुख्यमंत्री कार्यालयातल्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यासह कंपनीवर बंदी घालण्याची कारवाई कारण्याबाबत डीजीसीएला या आधीदेखील पत्र पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आता घाटकोपरच्या विमान दुर्घटनेनंतर या कंपनीचा भोंगळ कारभार समोर आला असून त्यावर केंद्रीय स्तरावर कारवाई अपेक्षित आहे. कंपनीकडे असलेल्या विमानांची आणि हेलिकॉप्टरची डीजीसीएने तपासणी करावी, याबाबतही मागणी करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरवरुन गडचिरोलीला जात असताना एकदा या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. यावेळी अपघात होता होता राहिला. त्यामुळे मोठे अघटित टळले. उस्मानाबादच्या दौऱ्यातदेखील एकदा त्याचे लँडिंग क्रॅश झाले होते. अलिबागला मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच हेलिकॉप्टरने उड्डाणाला सुरुवात केली होती. यावर अजूनही चौकशी सुरु आहे.
दरम्यान घाटकोपरमध्ये काल झालेल्या विमान दुर्घटनेनंतर यु वाय कंपनीचा परवाना रद्द करुन उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. या कंपनीचे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. या कंपनीचा अनुभव फक्त ४ वर्षांचा आहे. या कंपनीला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी विमानसेवा देण्याचा ठेका दिला होता. त्यानंतर दोनदा मुख्यमंत्री हेलिकॉप्टर अपघातातून वाचले. त्यानंतर कालही याच कंपनीचे विमान कोसळले आहे. उत्तरप्रदेशचे भंगार विमान खरेदी करुन एखादी विमानसेवा कोण चालवत असेल तर हा विषय गंभीर आहे. या अगोदरच्या अपघाताच्या चौकशीचे काय झाले, चौकशी झाली की नाही ? असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.