मुख्यमंत्र्यांचा दौर्‍याला रिंगरोड बाधितांचा ’गतिरोधक’!

0

पिंपरी-चिंचवड : शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन, भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शनिवारी (दि.12) होणार आहे. ही उद्घाटन, भूमीपूजन प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी न जाता प्रथमच बंदिस्त सभागृहातून होणार आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शहराचे कारभारी असताना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन उद्घाटन, भूमीपूजन करत होते. कामामंध्ये काही त्रुटी असल्यास पदाधिकारी, संबंधित अधिकार्‍यांना जाहीरपणे सांगून कानउघाडणी करत होते. मात्र, भाजपच्या काळात ’ई’ उद्घाटने केली जाणार आहेत.

महापालिकेत एकहाती सत्ता
महापालिकेत पहिल्यांदाच भाजपची एकहाती सत्ता आली आहे. सत्ता आल्यानंतर एखाद्या विकास कामाचे उद्घाटन, भूमीपूजन या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस पहिल्यांदाच शहरात येणार आहेत. भाजपची सत्ता येऊन पाच महिन्याचा काळ उलटून गेला. परंतु, भाजपची पाच महिन्याची कारकीर्द विकासकामांपेक्षा भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळेच जास्त चर्चेत राहिली, असल्याचे दिसून येत आहे.

रिंगरोड बाधितांना रोष
चिंचवड, थेरगाव, वाल्हेकरवाडी परिसरातील नागरिकांनी प्रस्तावित रिंगरोडला विरोध केला आहे. हा रिंगरोड रद्द करावा, यासाठी रिंगरोड बाधित नागरिक गेल्या दीड महिन्यापासून विविध मार्गाने आंदोलन करत आहेत. रिंगरोड बाधित नागरिकांचा सत्ताधार्‍यांवर रोष आहे. शहरातील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिका-यांना रिंगरोड बाधितांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यातच शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन, भूमीपूजन यासाठी मुख्यमंत्री शनिवारी पिंपरी-चिंचवड शहरात येत आहेत.

लांडगे सभागृहातच सर्व उद्घाटने, भूमीपूजन
रिंगरोड बाधित नागरिक मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याची शक्यता असल्याचा गुप्त वार्ता विभागाचा अहवाल आहे, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहातून शनिवारी दुपारी तीन वाजता शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमीपूजन करण्यात येणार आहे. एमआयडीसी आणि दिघी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन, पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहाचे उद्घाटन, निगडी भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपुल व ग्रेड सेपरेटरच्या कामाचे भुमिपुजन आणि साई चौक, जगताप डेअरी येथील ग्रेड सेपरेटरच्या कामाचे ’ई’ भूमीपूजन करणार आहेत. याशिवाय पुणे पोलिसांनी तरुणींच्या संरक्षणासाठी तयार केलेल्या ’बॅडी कॉप’चे अनावरण करण्यात येणार आहे.

सर्वच ई उद्घाटने
भाजपच्या सत्तेत पहिल्यादांच शहरातील विविध विकास कामांचे ’ई’ उद्घाटन, भूमीपूजन होणार आहे. याबाबत सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित शनिवारी पुण्यातही कार्यक्रम आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे जास्त वेळ नाही. ते केवळ दीडच तास देऊ शकणार आहे. त्यामुळे ‘ई’ उद्घाटन करण्यात येणार आहे.