मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला आणखी एक दणका दिला आहे. भाजप सरकारच्या काळात मंजूर झालेल्या कामांना स्थगिती देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील विकासकामांचा समावेश आहे. या कामांना दोन कोटींपासून 25 कोटी रुपयांपर्यंत अनुदान मिळाले होते. त्यांना स्थगिती देण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे, कोकण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गतील कामे, ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्र विकासाची कामे, यात्रा स्थळांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम या अंतर्गत मंजूर झालेल्या 2019-20 सालातील कामांना स्थगिती देण्याचे आदेश देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत अजूनही वर्क ऑर्डर न दिलेल्या कामांना स्थगिती देण्याचा आदेश दिले आहे.
भाजप सरकारच्या काळात ही कामे मंजूर झाली होती. मात्र कामांचे वाटप करताना सरकारने पक्षपातीपणा केल्याचा आरोप तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केला आहे. बहुतांश कामं ही भाजपच्या आमदारांना मिळाल्याचा दावा त्यांचा आहे. त्यामुळे कार्यारंभाला मंजुरी न दिलेल्या कामांना स्थगिती देण्याचे आदेश ठाकरे सरकारने दिले आहेत.