मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांमध्ये फूट पडण्याचा प्रयत्न-अजित नवले

0

कोल्हापूर : उसाला ३५00 रुपये दर मिळावा यासाठी राज्याचा प्रमुख या नात्याने योग्य निर्णय घेण्याचे सोडून स्वत: मुख्यमंत्री ऊस परिषद घेत आहे. परिषदेच्या माध्यमातून दर जाहीर करून शेतकरी व शेतकरी संघटनांमध्ये भांडणे लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केला. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांना संघर्षासाठी चिथावण्यापेक्षा ३५00 रुपये ऊसदर देण्याची हमी द्यावी, असे आवाहन डॉ. नवले यांनी केले.

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने कोल्हापुरात आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेच्या समारोपात डॉ. नवले बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी परिषदा घेण्याऐवजी साखरेला, उपपदार्थांना दर कसा जास्त मिळेल ते पाहावे, जेणेकरून शेतकऱ्यांना ३५00 रुपये दर मिळण्याची हमी मिळेल. हे न करता केवळ परिषदा घेऊन शेतकरी आणि शेतकऱ्यांमध्ये भांडणे लावण्याचे, त्यांना चिथावण्याचे काम करत असतील, तर राज्याचा प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री म्हणून त्यांना आणि त्यांच्या पदाला शोभणारे नाही.

शेतकऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी भूमिका घेण्याची गरज असताना ते जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. साखरेचे दर घसरत असताना त्याविषयी निर्णय न घेता परिषदेच्या माध्यमातून दर जाहीर करण्याची भूमिका घेणे हे मुळातच हास्यास्पद आहे.

साखरेचे भाव कमी कसे राहतील हे पाहायचे, शेतकऱ्यांना उरले सुरलेच मिळेल, अशी एका बाजूला व्यवस्था करायची आणि दुसऱ्या बाजूला अशाप्रकारे परिषद घेऊन आपणच शेतकऱ्यांचे कसे तारणहार आहोत, हे दर्शवणे म्हणजे त्यांचा शुद्ध खोटारडेपणा आहे.