मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर टिका : सत्तेच्या हव्यासापोटी बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती!

Chief Minister’s attack : So why do you want to call a gang that sells fathers? मुंबई : बाप चोरला, बाप चोरला, असे तुम्ही वारंवार म्हणता पण त्यांच्या विचारांना तिलांजली देऊन तुम्ही बापालाच विकण्याचा विचार केलात. मग आम्ही तुम्हाला बाप विकणारी टोळी म्हणायचं का? असा प्रतिहल्ला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर मुंबईतील बीकेसी मैदानावर आयोजित दसर्‍या मेळाव्यात केला. सत्तेच्या हव्यासापोटी बाळासाहेबांच्या विचारांना उद्धव ठाकरे यांनी मूठमाती दिल्याचे शिंदे म्हणाले शिवाय आज आनंद दिघेंची तुम्हाला आठवण झाली मात्र ते गेल्यानंतर आनंद दिघेंची प्रॉपर्टी किती आहे आणि कुणाकुणाच्या नावावर आहे ? असे तुम्ही विचारले होते, असा खळबळजनक दावाही शिंदे यांनी सभेत केला.

आता तरी उघडा डोळे
शिवसेना ही लाखो शिवसैनिकांच्या कष्टातून उभी राहिली आहे. तुम्ही शिवसेना कुणाच्याही दावणीला बांधता येणार नाही. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की तुम्ही सगळे शिवसैनिक आहात, म्हणून माझी शिवसेना आहे. पण हे बोलतात की लाखो गेले, आमदार गेले, खासदार गेले, तरी मी माझ्या पक्षाचा आहे म्हणतात. आता तरी डोळे उघडा. काँग्रेसवाल्यांनी पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, त्या पक्षाची आज अवस्था वाईट आहे. त्यांच्याकडे पक्ष आहे पण अध्यक्ष नाही, आणि इथे अध्यक्ष आहे पण पक्ष नाही, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी आपल्या दसरा मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरेंसह काँग्रेसची खिल्ली उडवली. ते मुंबईत बीकेसी येथे मैदानात आयोजित दसरा मेळाव्यात बोलत होते.

सत्तेपेक्षा सत्य आणि सत्व महत्वाचं
सत्तेच्या हव्यासापोटी बाळासाहेबांच्या विचारांना उद्धव ठाकरेंनी मूठमाती दिली. मी आज सांगतो. शिवसेना उद्धव ठाकरेंची नाही. शिवसेना एकनाथ शिंदेंची देखील नाही. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंचीच आहे आणि वारसा विचारांचा असतो. सत्तेपेक्षा सत्य आणि सत्व महत्वाचं. बाळासाहेबांचे वारसदार हे विचारांचे वारसदार. वारसा विचारांचा असतो तो जपायचा असतो, असेही एकनाथ शिंदे यांनी ठणकावले.

तुम्ही तर दिघेंची प्रॉपर्टी विचारली
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील बीकेसीत आयोजित दसरा मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केला. बंडखोरांना आज आनंद दिघेंची आठवण झाली आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी आज केली. त्याला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. ज्यावेळी आनंद दिघे गेले तेव्हा मला तुम्ही पहिला प्रश्न त्यांची प्रॉपर्टी किती आणि ती कुणाकुणाच्या नावावर आहे हे विचारलंत, असं विधान एकनाथ शिंदे यांनी केले.

मला तर धक्काच बसला
दिघे साहेब जेव्हा गेले तेव्हा मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तुम्ही दिघे साहेबांनी काय केलं? त्यांनी कसा पक्ष वाढवला? आता ठाण्यात पक्ष कसा वाढवता येईल? असं तुम्ही मला विचाराल असं वाटलं होतं. पण तुमचा पहिला प्रश्न आनंद दिघेंची प्रॉपर्टी किती आहे आणि कुणाकुणाच्या नावावर आहे ते तुम्ही विचारलंत. हे ऐकून मला धक्काच बसला होता. बाळासाहेबांची शपथ घेऊन मी हे सांगतो. आजवर मी हे बोललो नाही. मी खोटं बोलून सहानुभूती मिळवणारा नाही. आनंद दिघेंचं साधं बँकेत खातंही नव्हतं, असं एकनाथ शिंदे म्हणाले. आनंद दिघे म्हणायचे एक दिवस ठाण्याचा मुख्यमंत्री बनवणार. तुम्ही दिघेंचेही पाय कापलेत. रामदास कदम बरोबर बोलले, असंही शिंदे म्हणाले.

कटप्पा प्रामाणिक होता, पण तुम्ही तर दुटप्पा
उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना ’बाहुबली’तील कपट्टाची उपमा दिली. त्यावरही एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. आम्ही कटप्पा असू तर तो कटप्पापण प्रामाणिक होता. तुम्ही तर दुटप्पा निघालात. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडून जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला. तुम्ही पक्ष वाढीसाठी काय केलं? कुणाला कधी चापट तरी मारलीय का? तुम्हाला कोथळा काढण्याची भाषा शोभत नाही. इथं एकनाथ शिंदेंच्या अंगावर 100 केसेसे आहेत. त्या काय चोरीच्या केसेस नाहीत. माझ्या नातवावर टीका करता. काय वेळ आली तुमच्यावर. माझ्या दीड वर्षांच्या नातवाचा काय दोष?, खरंतर रुद्रांशच्या जन्मानंतर तुमचं अध:पतन सुरू झालं. दीड वर्षाच्या बाळावर कसली टीका करता, असं एकनाथ शिंदे म्हणाले.