मुंबई । महापालिकांचा प्रचार संपल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना मुलाखती देण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे हा आचारसंहितेचा भंग आहे, असा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांविरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री जनतेवर दबाव टाकत असल्याचा आरोपही शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. दादरच्या शिवसेना कार्यालयात शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अनिल देसाई आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला आहे.
अशा प्रचारासाठी मुख्यमंत्रीपद सोडा
प्रचार करायचा असेल तर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. मुख्यमंत्री जे करत आहेत ते पारदर्शकतेच्या मापदंडात बसत नाही. आम्ही प्रचारानंतर मुलाखत देणे बंद केले आहे. निवडणूक आयोगाने मुख्यमंत्र्यांना विशेष परवानगी दिली असेल तर तशी परवानगी सगळ्यांना मिळायला हवी.’ असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. कमळाचे चिन्ह लावून सरकारी निवासस्थानी मुलाखती प्रचाराची वेळ संपली असतानाही काल रात्री मुलाखत दिली. छातीवर कमळाचे चिन्ह लावून सरकारी निवासस्थानी मुख्यमंत्र्यानी मुलाखतींचा धडाका लावलाय, हा सरकारी अधिकारांचा गैरवापर आहे, मुख्यमंत्र्यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केलाय. फडणवीसांविरोधात आचारसंहिताभंगाची तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. मुंबईसह राज्यातील दहा महानगरपालिकेसाठी 21 तारखेला मतदान होणार आहे. 23 तारखेला निकाल आहे.
शिवसेनला रडीचा डाव खेळण्याची सवय
मुख्यमंत्र्यांनी मुलाखती देवून आचारसंहितेचा भंग केला अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे केली यावर भाजपाकडून सेनेला प्रत्युत्तर माधव भंडारी यांनी दिले आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेचा भंग केलेला नाही. ते जे करतात त्याची त्यांना जाणीव आहे तरीसुध्दा शिवसेनेने तक्रार केली असेल तर त्यांची शहानिशा करण्यास कायदा सक्षम आहे. शिवसेनला रडीचा डाव खेळण्याची सवय आहे.‘मुख्यमंत्री अनेक वर्षे राजकारणात असुन त्यांना संसदेचा अनुभवही आहे. भाजपविरोधात तक्रारी करणे हा कार्यक्रम सेनेने राबवला आहे. आपल्याला किती जागा मिळतील याचा अंदाज ते बांधू शकत नाही. त्यामुळे पराभवाच्या मानसिकतेत ते गेले आहेत.’ अशी टीकाही भांडारींनी केली.