मुख्यमंत्र्यांची सर्व मंत्र्यांना तंबी

0

मुंबई (राजा आदाटे) । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा सामना करण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. विरोधकांना मर्मावर बोट ठेवण्यासाठी संधी मिळू नये म्हणून त्यांनी सर्व मंत्र्यांना सूचना दिला आहेत. शिवाय कसल्याही परिस्थितीत कामकाजाला दांडी मारू नका, असा लेखी फतवाही त्यांनी जारी केला आहे. याबबाबतचे त्यांच्या सहीचे पत्र 25 तारखेलाच सर्व मंत्र्यांच्या कार्यालयात पोहोचवण्यात आले आहे.

मला विचारल्याशिवाय रजा नाही
एखाद्या अपरिहार्य कारणासाठी रजा घ्यायची असेल तर त्याबाबतचा विनंती अर्ज संसदीय कार्यमंत्र्यांमार्फत मला पाठवावा, असे त्यांनी त्या पत्रात म्हटले आहे. मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे दोन्ही सभागृहांत कामकाज बंद पडणार नाही याची दक्षता घ्या, असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. मंत्री सभागृहात नसल्यामुळे विरोधीपक्षाच्या रोषाला सामोरे जावे लागते. ती वेळ आणू नका? असे त्यांनी मंत्र्यांना सुनावले आहे.

तांत्रिक कारणामुळे नामुष्कीची वेळ
विरोधी पक्षाला नमवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चांगलीच तयारी केली आहे. त्यामुळेच त्यांनी मंगळवारी सभागृहात गदारोळ सुरू असतानाही त्यांनी कमला मिल आगीच्या प्रकरणाबाबतच्या लक्षवेधीला जोरदार उत्तर दिले. विरोधी पक्षाच्या सदस्यांना चौकशीच्या फेर्‍यात अटकवण्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले. मात्र, कालपासून तांत्रिक कारणास्तव त्यांना दोनदा नामुष्कीचा सामना करावा लागला आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावर त्यांची चांगलीच गोची झाली.