स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्याप्रमाणेच दुसर्या टप्प्यातही भाजपला घवघवीत यश मिळाले. पुणे व लातूर जिल्ह्यातील 14 पैकी पाच नगरपालिकांत भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. त्या खालोखाल काँग्रेस तीन, तर राष्ट्रवादीला दोन ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आणता आला. जुन्नर पालिकेत शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि इतर ठिकाणी आघाड्यांचे नगराध्यक्ष झाले असले तरी भाजपचे सर्वाधिक व त्या खालोखाल काँग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले आहेत. आम्ही या निवडणुकांकडे वेगळ्या अंगाने पाहतो. लोकं भाजपवर प्रचंड चिडून आहेत, तरीही ते त्यांनाच मते देत आहेत. याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटते. काँग्रेस अन् राष्ट्रवादीला सातत्याने नाकारले जात असेल तर त्यांनी आता आत्मचिंतन करावे! मिळालेल्या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यातही भाजपला चांगले यश मिळाले. लोकांच्या मनात भाजपविषयी राग असतानाही सत्तेत असलेल्या या पक्षाला मतदान होतेच कसे? याबद्दल खरे तर आता विरोधकांनी आत्मचिंतन करावे. दुसर्या टप्प्यात खरे तर भाजपसाठी अजिबात अनुकूल वातावरण नव्हते. निर्माण झालेल्या चलनकल्लोळामुळे प्रत्येक ठिकाणी जनमानसांत प्रचंड खदखद आहे. तरीही लोकं भाजपला मतदान करत असतील तर ही विरोधकांसाठी खचितच धोक्याची घंटा म्हणावी लागेल. स्थानिक पातळीवरील राजकारण आणि केंद्रीय राजकारणात फरक असतो. नगरपालिका निवडणुका या स्थानिक मुद्द्यावर लढवल्या जातात. त्या स्थानिक नेत्यांभोवती फिरत असतात, हे खरे असले तरी राज्य आणि देशातील भाजपचा कारभार पाहता त्याचा अगदी तळागाळातील माणसाला त्रासच होत आहे. तथापि, या त्रासाकडे दुर्लक्ष करून मतदार या पक्षाच्या झोळीत मतांचे दान टाकत असेल तर सत्ताधारी नशीबवान म्हणायला हवेत. पुणे जिल्हा हा खरा तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. काँग्रेसचीही ताकद या जिल्ह्यात मोठी आहे. तरीही लोणावळा, तळेगाव दाभाडे या मावळातील नगरपालिका, आळंदीसारखी प्रसिद्ध नगरपालिका या पक्षाच्या ताब्यात गेली. राष्ट्रवादीसाठी ही चांगली बाब खचितच नाही. आळंदी नगरपालिकेत भोसरीचे भाजपवासी झालेले आमदार महेश लांडगे यांनी लक्ष घातले होते. मुख्यमंत्र्यांच्या विश्वासास लांडगे पात्र ठरले असून, ते शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना राजकीय शह देण्यास यशस्वी झालेत. पवार कुटुंबीयांचा अभेद्य गड असलेल्या बारामतीत राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनी ठासून दारूगोळा भरला होता. परंतु, त्यांचा बार फुसकाच ठरला. गावातच आव्हान मिळाल्याने अजित पवारांना बारामतीतून बाहेर पडता आले नव्हते. त्यामुळे त्यांना चांगलीच मेहनत घ्यावी लागली. ही मेहनत फळाला आली असून, चार जागा हातच्या गेल्या तरी सत्तेचे बहुमत त्यांना निर्विवाद प्राप्त करता आलेे. या बालेकिल्ल्यात भाजपने बारामती विकास आघाडीच्या माध्यमातून आव्हान उभे केले होते. खुद्द मुख्यमंत्र्यांनी येथे सभा घेऊन पवारविरोधकांना राजकीय ताकद दिली होती. पवारांना पाणी पाजण्याची भाषाही त्यांनी केली. परंतु, भाजप आघाडीला केवळ चार जागा मिळू शकल्यात. त्यातून बारामतीकरांनी मुख्यमंत्र्यांनाच पाणी पाजले हे आपसूक सिद्ध झाले. इंदापुरात काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतच झालेल्या चुरशीच्या लढतीत एका मताने ते राष्ट्रवादीला धोबीपछाड देऊ शकलेत. पुणे जिल्ह्यातील दहापैकी शिरुर, सासवड, दौंड या नगरपालिकांत स्थानिक आघाड्यांना यश मिळाले. लोणावळा, तळेगाव दाभाडे, आळंदीत भाजपने बाजी मारली, तर जुन्नरचे नगराध्यक्षपद शिवसेनेला मिळाले असले तरी राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्यात. इंदापूर, जेजुरीत काँग्रेस अन् बारामतीमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली. लातूर जिल्ह्याचा विचार करता हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु, या जिल्ह्यातही भाजपने मारलेली मुसंडी ही काँग्रेससाठी चिंतेची बाब म्हणावी लागेल. औसा, उदगीर, निलंगा आणि अहमदपूर या चार नगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकांत भाजपचे यश खरे तर विरोधकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन ठरेल. हे निकाल काँग्रेससाठी धक्कादायक आहेत. उदगीरमध्ये तर काँग्रेसचे 35 वर्षांचे संस्थान भाजपने खालसा केले. निलंग्यात पुतण्याने पुन्हा एकदा काकावर मात केली. विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला बसलेला हा दुसरा धक्का आहे. कामगार कल्याणमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी नगरपरिषदेचा गड खेचून आणताना 20 पैकी 17 जागा जिंकल्यात. अहमदपूरमध्ये त्रिशंकू परिस्थिती असली तरी राष्ट्रवादी अन् काँग्रेसला सत्तेबाहेर फेकण्यात आ. विनायक पाटील यांच्या नेतृत्वातील बहुजन विकास आघाडीला यश आले. नाही म्हटले तर औसा नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपपेक्षा जास्त जागा मिळाल्यात, त्याने तरी या जिल्ह्यात राष्ट्रवादीची लाज राखली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास दुणावला होता. अंतर्गत लाथाळ्यांनी परेशान झालेली काँग्रेस दुसर्या टप्प्यातील निवडणुकांतही तोंडघशी पडली. त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्थानिक नेत्यांसोबतच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अजित पवार, सुनील तटकरे यांनी या निवडणुकांत लक्ष घातले होते. त्यामुळे दुसर्या क्रमांकाची मते तरी हा पक्ष मिळवू शकला. सासवड नगरपरिषदेत सत्ता मिळवण्याची शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे यांना सुसंधी होती. मात्र, त्यांना जनमत आघाडीने झटका दिला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संस्थाने विसर्जित करण्याचे काम मुख्यमंत्री फडणवीस मोठ्या खुबीने करत आहेत. दुसर्या टप्प्यातील त्यांचे डोळ्यात भरणारे यश हे संस्थाने विसर्जित करण्याच्या मोहिमेतील एक यशस्वी पाऊल म्हणावे लागेल. लोकं तुमच्या पक्षावर नाराज असले तरी तुम्हाला मते देत आहेत, त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांचे खास अभिनंदन!