जळगाव: भाजपच्या महाजानादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. दरम्यान आता मुख्यमंत्र्यांचे जळगाव शहरात आगमन झाले आहे. सागर पार्क येथील मैदानावर त्यांची सभा सुरु झाली आहे. भाजप सरकारच्या पाच वर्षाच्या काळात मोठ्या प्रमाणात निधी जळगाव जिल्ह्याला मिळाला. त्यातून मोठ्या प्रमाणात विकास कामे झाले. जळगाव शहर आणि जिल्ह्याला सुजलाम सफलाम करण्याचे काम आमच्या सरकारने केले आणि त्याचे श्रेय मुख्यमंत्र्याचे आहे असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीची मोठी दयनीय अवस्था झालेली आहे. मी काही दिवसांपूर्वी दोन्ही कॉंग्रेसच्या ४० जागा निवडून येथील असे म्हणत होतो, मात्र आता तर दोन्ही कॉंग्रेसच्या ४० ही जागा निवडून येणार नाही असे मला वाटत आहे. मी जे म्हणतो ते खरे होते ते आजपर्यंत तुम्ही अनुभवले आहे असे गिरीश महाजन यांनी सांगितले.
जळगाव शहराचा एका वर्षात विकास करू असे आश्वासन आम्ही दिले होते. ते आश्वासन आम्ही पूर्ण केले आहे. आमच्यासाठी काश्मीर प्रश्नासारखा असलेल्या हुडकोचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे मोठे योगदान लाभले. राहिलेले प्रश्न आठ दिवसात सोडवू असेही गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.
जळगाव शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठे सहकार्य केले आहे. महाजानादेश यात्रेनिमित्त जळगावकरांना मुख्यमंत्र्यांचे ऋण व्यक्त करण्याची संधी मिळाली असल्याचे आमदार सुरेश भोळे प्रास्ताविकात सांगितले. ५ वर्षात ९०० कोटींचा निधी जळगाव शहराला मिळाला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आभार आमदार भोळे यांनी व्यक्त केले.
मनपा निवडणुकीच्या वेळी दिलेला शब्द भाजपने पूर्ण केला आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांचे मोठे सहकार्य लाभले. हुडकोच्या कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांनी शासन निर्णय करून आम्हा जळगावकरांना न्याय दिला असल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले. आजपर्यंत मुख्यमंत्र्यांनी जळगावकरांना भरभरून दिले आहे. आता शेवटची मागणी आहे, गाळ्याचा प्रश्न सोडवून मुख्यमंत्र्यांनी शहराच्या विकासाला गती द्यावी अशी मागणी आमदार भोळे यांनी केले.
याठिकाणी विविध समाजाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्याने आणि धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या योजना लागू केल्याबद्दल सन्मान करण्यात आले. ट्रिपल तलाक बिल पास केल्याने मुख्यमंत्र्यांचे मुस्लीम महिलांनी सन्मान केला.