मुख्यमंत्र्यांच्या अपघात चौकशीसाठी पथक पोहोचवले निलंग्यात

0

निलंगा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या काही सहकार्‍यांना घेऊन गुरुवारी दुपारी 12च्या सुमारास निलंग्याहून मुंबईच्या दिशेने उड्डाण केलेले हेलिकॉप्टर काही क्षणात 100 फुटांवरून खाली कोसळले. या अपघात मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी सुदैवाने बचावले. हा अपघात नेमका कसा झाला, याची चौकशी करण्यासाठी आता मुंबईच्या नागरी हवाई उड्डाण विभागाचे एक पथक निलंग्यात दाखल झाले असून, ते या अपघाताची कसून चौकशी करत आहे.

सध्या हे अपघातग्रस्त हेलिकॉप्टर चोवीस तास पोलिस देखरेखीखाली आहे. आणखीन किमान चार दिवस त्याच जागेवर हेलिकॉप्टर राहील. अपघाताची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने नागरी हवाई उड्डाण विभाग मुंबईचे सहाय्यक संचालक यशपाल यांच्या नेतृत्वाखाली प्रीतम रेड्डी व इतर पाच जणांचे चौकशी पथक निलंग्यात पाठवले आहे. या पथकाने दुर्घटनाग्रस्त स्थळाची व हेलिकॉप्टरची पाहणी केली. आवश्यक त्या नोंदी त्यांनी घेतल्याची माहिती महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. भवानजी आगे पाटील यांनी दिली. या वेळी तहसीलदार विक्रम देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी गोपाळ रांजणकर, पोलिस निरीक्षक कल्याण सुपेकर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एन. जी. वैष्णव आदी उपस्थित होते.