धुळे। विकास कामांच्या उद्घाटनासाठी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळ्यात येत आहेत. मात्र गेल्या आठवड्याभरापासून मुख्यमंत्र्याच्या धुळे दौर्याला धरून राजकीय वर्तुळात पत्रक वादाला उधान आले आहे. शहराचे आ. गोटे धुळ्याच्या विकासासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगत आहेत. पण विरोधकांना ते नको आहे म्हणून राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांची सभा उधळून लावण्याचा चंगच बांधला आहे. तसेच वेळ पडल्यास काळे झेंडे दाखवणे, सभेवर दगडफेक करणे आदी चर्चांना उधाण आले आहे. यानिमित्ताने गेल्या आठवड्यापासून आ.गोटे आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार पत्रकबाजी सुरु आहे. यातून उभयंतांमध्ये अगदीच खालच्या पातळीवर जाऊन आरोप प्रत्यारोप होत आहे. आता या दोघांमध्ये शिवसेनेने उडी घेतली आहे. शिवेसेनेच नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी आ.गोटेंवर तोंडसुख घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीले आहेत. त्यात त्यांनी आ.गोटेंवर गंभीर आरोप करीत बेकायदेशीर कामांच्या उद्घाटनातून आपली स्वच्छ प्रतिमा मलीन होईल, असा इशारा दिला आहे. आ.गोटे राष्ट्रवादीशी दोन हात करीत असतांनाच आता शिवसेनेने या भांडणात उडी घेतली. यामुळे आ.गोटे त्यांच्या शेलकी भाषेत शिवेसेनेलाही अंगावर घेतल्याशिवाय राहणार नाहीत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यात गुंडांना पक्षात प्रवेश दिल्यावरुन आ.गोटे यांनी लक्ष केलेला भाजपातील एक गट नाराज आहे. यामुळे भाजपच्या त्या नाराज गटाचाही मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रमाला विरोध आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि स्थानिक भाजपातील नाराज गट आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्ते यांचा मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला तीव्र विरोध असतांना सुध्दा मुख्यमंत्र्यांची सभा कशी यशस्वीपणे आणि सुरळीत पार पाडावी, या प्रयत्नात आ.गोटेंसह स्थानिक प्रशासन आहे.
आयुक्तांनी घेतला अधिकार्यांकडून आढावा
जलयुक्त शिवार अभियानाच्या 2016- 2017 मधील कामांना संबंधित सर्व विभागांनी समन्वयातून गती देत ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, असे निर्देश नाशिक विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे यांनी येथे दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात सकाळी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त श्री. मित्रगोत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, महानगरपालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे (रोहयो), उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ (धुळे), नितीन गावंडे (शिरपूर), तहसीलदार रोहिदास वारुळे (शिंदखेडा), महेश शेलार (शिरपूर), संदीप भोसले (साक्री), ज्योती देवरे (धुळे शहर) यांच्यासह विविध विभांगांचे प्रमुख उपस्थित होते.आयुक्त झगडे म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानातील कामांमध्ये लोकसहभाग वाढविला पाहिजे. गॅबियन बंधार्यांची संख्या वाढवावी. तसेच सामाजिक दायीत्व निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. याशिवाय प्रत्येक गावाचे दरडोई उत्पादन काढून ते वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कृषी विभागाने प्रत्येक गावाचा मार्केट प्लॅन तयार करावा. आदिवासी विकास विभागाने आपल्या कार्यक्षेत्रातील एक गाव मॉडेल व्हिलेज म्हणून विकसित करावे, असेही निर्देश आयुक्त झगडे यांनी दिले. यावेळी आयुक्त झगडे यांनी मागेल त्याला शेततळे, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री आवास योजना,तूर खरेदीचा सविस्तर आढावा घेतला.
जलयुक्त शिवार अभियानाची आढावा बैठक
शिंदखेडा: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी 11 वाजेनंतर शिंदखेडा तालूक्यात विविध कामांचे भूमिपूजन व उद्घाटन होणार आहे. यावेळी राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचीही प्रमुख उपस्थिती आहे. शहरात कचेरी चौकातील नवीन प्रशासकिय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. याच आवारात जलयुक्त शिवार अभियानाची आढावा बैठक होणार आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतक-यांशी संवाद साधणार आहेत. तालूक्यातील साळवे येथे डिजीटल शाळेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असून ते जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांची पाहणी करणार आहेत. शिंदखेडा ते वरपाडा या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौ-यानिमीत्त शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विरोधी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक फौजदारी स्वरूपाच्या नोटीसा पोलीस निरीक्षक भोज यांनी बजावल्या आहेत. पोलीस विभागाने केलेल्या कारवाईचा निषेध या नेत्यांनी केला आहे.
आसपासही फिरकू दिले जाणार नाही- आ.गोटे
मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी व विविध कामांचा आढावा घेण्रासाठी धुळे जिल्हा दौर्यावर येत असून धुळे जिल्ह्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून काहीतरी भरघोस असे पदरात पाडून लाभ मिळवून घेण्यासाठी हा दौरा लाभदायी ठरणार आहे. मात्र विरोधक सभा उधळण्याची भाषा करीत आहेत. मुख्यमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा असते. यामुळे त्यांना जवळपासही फिरकु दिले जाणार नाही. सभेचे व्यासपीठ तर फार दुरची गोष्ट आहे, एवढे देखील यांना कळत नाही का? अशा शब्दात शहराचे आ.अनिल गोटे यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. आ. गोटे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्या धुळे दौर्यावर येत आहेत. मुख्यमंत्र्यांनी धुळ्यासाठी राज्यात सर्वात जास्त विकास निधी दिला असताना विरोधक विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांकडून धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी काहीतरी भरघोस निधी पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहोत. असे असतांना सत्ताधार्यांना बदनाम करण्याचे षडयंत्रच विरोधक रचत आहेत.
मुख्यमंत्र्यांचा दौरा असा : दुपारी 1.35 वाजता साळवे हेलिपॅड ता.शिंदखेडा जि.धुळे येथे आगमन. दुपारी 1.40 वाजता मोटारीने पाहणीस्थळाकडे प्रयाण. दुपारी 1.45 वाजता पाहणीस्थळ येथे आगमन. दुपारी 1.45 वाजता जलयुक्त शिवार अभियान व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कामाची पाहणी. दुपारी 2.15 वाजता साळवे येथून मोटारीने शिंदखेडाकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता शिंदखेडा येथे आगमन. दुपारी 2.30 वाजता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत शिंदखेडा वरपाडा रस्त्याचे भूमीपुजन. दुपारी 2.40 वाजता मोटारीने तहसिल कार्यालयाकडे प्रयाण. दुपारी 2.45वाजता तहसिल कार्यालय शिंदखेडा येथे आगमन. दुपारी 2.45 वाजता मध्यवर्ती प्रशासकीय संकुल इमारतीचा लोकार्पण सोहळा. दुपारी 3.00 वाजता धुळे जिल्हा आढावा बैठक. सायंकाळी 4.30 वाजता मोटारीने शिंदखेडा हेलिपॅडकडे प्रयाण. सायंकाळी 4.35 वाजता शिंदखेडा हेलिपॅड येथे आगमन. सायंकाळी 4.40 वाजता हेलिकॉप्टरने धुळेकडे प्रयाण. सायंकाळी 4.55 वाजता पोलीस मुख्यालय हेलिपॅड धुळे येथे आगमन. सायंकाळी 5.00 वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सायंकाळी 5.05 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन. सायंकाळी 5.35 वाजता शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनकडे प्रयाण. सायंकाळी 5.40 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नुतन इमारतीचा लोकार्पण सोहळा. सायंकाळी 6.05 वाजता मोटारीने पांझरी नदी तळफरशी पुलाकडे प्रयाण. सायंकाळी 6.15 वाजता तळफरशी पुल येथे आगमन. सायंकाळी 6.15वाजता तळफरशी पुलाचा लोकार्पण सोहळा. सायंकाळी 6.25 वाजता पांझरा नदी येथून मोटारीने सभास्थळाकडे प्रयाण. सायंकाळी 6.30 वाजता सभास्थळ येथे आगमन. सायंकाळी 6.30 वाजता विशेष निधी अंतर्गत रस्ता कामाचा शुभारंभ, पोलीस चौकी व भाजी विक्रेत्यांसाठी ओटे लोकार्पण व जनसंवाद कार्यक्रम. सायंकाळी 7.40 वाजता सभास्थळ येथून मोटारीने ओझर विमानतळ, नाशिककडे प्रयाण.
माजी आ.प्रा.शरद पाटील यांना नोटीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विविध विकासकामांच्या उदघाटनासाठी व अन्य कामांचा आढावा घेण्रासाठी धुळे जिल्हा दौर्यावर रेत आहेत. या पार्श्वभुमीवर धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांना धुळे पोलीस प्रशासनाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रा.शरद पाटील यांनी मुख्यमंत्री ही कुणाची खासगी मालमत्ता आहे का? असा प्रश्न उपस्थितकरुन जिल्हा पोलीस प्रशासनाला सदर नोटीस मागे घ्यावी अन्यथा न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काही असामाजिक शक्ती व राजकीय कार्यकर्त्यांना जिल्हा पोलीस प्रशासनाने सीआरपीसी 139 अन्वये नोटीसा बजावल्याचे समजते.