मुख्यमंत्र्यांच्या धमकीला घाबरत नाही : राजू शेट्टी

0

मुंबई । शेतकरी संपाच्या आड काही राजकीय पक्षांचे नेते हिंसा घडवत असून, त्यांची नावे आमच्याकडे आहेत, असे म्हणणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तेतील सहभागी घटकपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी थेट आव्हान दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या धमकीला घाबरत नाही. त्यांनी आधी माझी कुंडली काढावी, असे ट्विट शेट्टी यांनी केले आहे. शेतकरी आंदोलनाला फारसा प्रतिसाद मिळत नाही. आंदोलनात राजकीय कार्यकर्ते घुसले आहेत. ते तोडफोड व जाळपोळीचे प्रकार करीत आहेत, शेतकर्‍यांचा संपाला पाठिंबा नाही, शेतकर्‍यांच्या आडून राजकारण सुरू आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस काल पत्रकार परिषदेत म्हणाले होते. त्यावर राजू शेट्टी यांनी जोरदार हल्ला चढवला.

आता देशव्यापि आंदोलन
जर आंदोलनात दम नाही, असे सरकारचे म्हणणे असेल तर सरकार शेतकर्‍यांना का घाबरले आहे, असा सवाल त्यांनी विचारला. त्यानंतर आज पुन्हा शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवरच हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या धमकीला मी घाबरत नाही. त्यांनी आधी माझी कुंडली काढावी, असे थेट आव्हानच शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलन आता देशव्यापी करण्यात येणार आहे. त्यासाठी 16 जून रोजी दिल्लीत गांधी पीस फाऊंडेशन येथे देशभरातील शेतकरी संघटनांच्या प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती शेट्टी यांनी दिली. केंद्र सरकारला त्यांनी दिलेल्या आश्वासनांची जाणीव करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

समितीच्या बैठकीत चर्चेबाबत निर्णय घेतला जाईल
दरम्यान, सरकारसोबत चर्चा करणार का, या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून चर्चेचा प्रस्ताव अद्याप आलेला नाही, असे त्यांनी सांगितले. सुकाणू समितीची बैठक 8 जूनला नाशिकला होणार असून त्यापूर्वी प्रस्ताव आला तरी समितीच्या बैठकीत चर्चेबाबत निर्णय घेतला जाईल. एखाद-दुसर्‍या संघटनेशी चर्चा करून तोडगा काढण्याचे प्रकार चालणार नाहीत. सर्वाशी एकत्रित चर्चा करून सुकाणू समिती आंदोलनाची रूपरेषा आणि चर्चेबाबत भूमिका ठरवील. संघटनेची अनेक आंदोलने झाली व आमचे चर्चेचे दरवाजे कायम खुले असतात, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले होते.