मुंबई :- राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत कितीही जोरदार भाषण केले तर त्याचा कोणताही परिणाम परदेशी गुंतणूकदारांवर होत नसतो. त्याचे कारण म्हणजे परदेशी गुंतवणूकदार हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांची विधानसभेतील भाषण ऐकत नाहीत तर ते आतंरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित संस्थांचे अहवाल वाचून गुंतवणूक करीत असल्याचा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारला लगावला आहे.
राज्यात ८ लाख कोटी रूपयाची गुंतवणूक केली असल्याचा दावा राज्य सरकारकडून केला जात आहे. मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटीक महाराष्ट्र यासारखे फक्त इव्हेंट भरविले जात आहेत आणि नुसते आकडे सांगितले जात आहेत. मात्र प्रत्यक्षात काहीही झालेले नाही. राज्यात किती हजार कोटी रूपयाची प्रत्यक्ष गुतवणूक झाली आहे याची माहितीच्या अधिकारात माहिती मागितली आहे मात्र राज्याच्या माजी मुख्यमंत्र्याला देखील ही माहिती दिली गेली नसल्याची खंत पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात व्यक्त केली.
राज्यातील मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत कितीही जोरात भाषण केले असले तरी ते भाषण परदेशी गुंतवणूकदार ऐकत नसतात तर परदेशी गुंतवणुकदार हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित संस्थानी जे भारताबद्दल तसेच मुंबई बद्दल जे अहवाल दिले आहेत ते अहवाल वाचून परदेशी गुंतवणूकदार निर्णय घेत असतात. त्यामुळे राज्यातील सरकारने कितीही आकडे फुगवून सांगितले असले तरी त्यांचा हा दावा फोल ठरला आहे. बुलेट ट्रेन , हायपरलूप ट्रेन, यासह अनेक दिवास्वप्न दाखवून फक्त हजारो कोटी रूपयाचे आकडे रंगविले जात आहेत.प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळीच असल्याची माहिती चव्हाण यांनी सभागृहात दिली.
मुंबई ही आर्थिक राजधानी राहिली नाही.
राज्याची आर्थिक राजधानी ही मुंबई राहिली नाही. ऑक्सफर्ड स्टडीज फॉर इन्हेसमेंट या नामांकित संस्थेने दिल्ली शहर हे आर्थिक प्रगतीत भारतात एक नंबरचे शहर असल्याचे त्यांच्या अहवालात म्हटले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मात्र हे पटत नाही मुंबई ही देशाची राजधानी आहे असेच सांगत आहे. मात्र परदेशातील गुंतवणूकदार हे राज्याच्या मुख्यमंत्र्याचे विधानसभेतील भाषण ऐकत नाहीत तर ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थाचे अहवाल वाचतात आणि ते गुंतवणूक करायचे ठरवत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात सांगितले.