मुख्यमंत्र्यांच्या सचिवांनी घेतला देहुगावचा आढावा

0
देहु :देहु गाव हे संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला परिसर आहे. त्यांचे मंदिर आणि गाथा मंदिर परिसरात कायम भाविकांची गर्दी होत असते. आळंदी आणि देहु येथे वारकरी, भाविक, पर्यटकांची कायम वर्दळ असते. त्यामुळे येणार्‍या भाविकांना आणि येथील स्थानिक रहिवाश्यांनाही विविध सुविधा मिळणे गरजेचे आहे. राज्यातील वारकरी सांप्रदयाची श्रद्धास्थानातील स्थानिक नागरिकांचे महत्त्वाचे प्रश्‍न आणि विविध विकासकामांची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव श्रीकांत भारती यांनी देहूनगरीला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी श्रीकांत भारती यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला.
अपुर्‍या कामांची घेतली माहिती
यावेळी देवस्थानच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, राज्यामध्ये संत ज्ञानेश्‍वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपान, संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज व संत तुकाराम महाराज यांची कर्मभूमी आहे. या कर्मभूमीत पर्यटकांची, भाविकांची, वारकर्‍यांची कायम गर्दी असते. तेथील मंदिर परिसरात किंवा शहरात नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. त्या नेमक्या कोणत्या समस्या आहेत, याची पाहणी करून त्या जाणून घेण्यासाठी आलो असून, भविष्यात या समस्या सोडविण्याचे प्रयत्न करण्यासाठी भेट दिली असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी देहूच्या नागरिकांकडून समस्या जाणून घेतल्या व विकास आराखड्यातील अपुर्‍या कामांची माहिती घेतली. यामध्ये प्रामुख्याने देहू-आळंदी रस्त्याचे भूसंपादन व रस्ता करणे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, सांडपाणी व्यवस्थापन आणि इंद्रायणी नदीवर बोडकेवाडी येथील बंधारा, मुख्यमंदिराच्या मागे इंद्रायणी नदीमध्ये छोटा बंधारा आणि इंद्रायणी व सुधा नदीच्या संगमावरील वसंत बंधारा नव्याने बांधणे या संदर्भात प्रामुख्याने चर्चा केली. यानुसार येणार्‍या विविध समस्यांवर त्यांनी चर्चा केली. यानंतर संस्थान व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे मत जाणून घेतले. आपल्या समस्या लिखीत स्वरूपात देण्यासंदर्भात सूचना दिल्या.
देहुतील समस्या मांडल्या
श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी मंदिर परिसरात जाणवणार्‍या विविध समस्यांबाबत माहिती दिली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, रस्त्यांचा प्रश्‍न, आरोग्याचे प्रश्‍न मांडले. तसेच तीर्थक्षेत्र परिसरात विकासकामे करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केली. यावेळी विश्‍वस्त अशोक निवृत्ती मोरे, सुनील दामोदर मोरे, अभिजित मोरे, विठ्ठल मोरे, माजी विश्‍वस्त नितीन मोरे, सरपंच उषा चव्हाण, माजी सरपंच हेमा मोरे, ग्रामपंचायत सदस्या दिपाली जंबुकर, संजय जंबुकर, संभाजी टिळेकर आदी उपस्थित होते.