लासलगाव । येथे रविवारी मुख्यमंत्र्यांना शेतकर्यांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. रेल्वे प्रशासन व खरेदी विक्री संघ यांच्या समन्वयातुन उभारण्यात येत असलेल्या अडीच हजार मेट्रिक टन क्षमता असलेल्या बहुउद्देशीय शितगृहाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री व्यासपीठावर बोलण्यासाठी उभेरातच शेतकरी संघटनेने जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. रेल्वे मंत्री सुरेश प्रभु, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, खा. हरीशचंद्र चव्हाण, पालकमंत्री जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,ग्रामविकास राज्य मंत्री दादासाहेब भूसे पर्यटन मंत्री जयकुमार रावल, नाफ़ेडचे संचालक नानासाहेब पाटील आदींची याप्रसंगी उपस्थिती होती.
शेतकरी आक्रमक
लासलगाव येथे मुख्यमंत्र्यांनी भाषण सुरू करताच शेतकरी आक्रमक झाले. अनेक जणांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्मित झाले. मुख्यमंत्र्यांनी शेतकर्यांना शांततेचे आवाहन केल्यानंतर अखेर थोड्या वेळाने शेतकरी शांत झाले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाषण सुरू केले.
कांदा हसवतोही…रडवतोही
शेतकरी सक्षम करण्याची दिशा सरकारची आहे. त्यादिशेने सरकार वाटचाल करत आहे. लवकरच विजेचे फिडर सोलरवर टाकावयाचे आहेत, त्याची सुरुवात राळेगणसिद्धी येथून करण्यात येणार आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते पुढे म्हणाले की, लासलगावचा कांदा हसवतोही आणि रडवतोही असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी कांद्याच्या सध्याच्या वाढलेल्या दरांवर समाधान व्यक्त केले आहे. भाव नव्हता तेव्हा कांद्यामुळेच शेतकर्यांना रडावे लागले होते. भाव मिळत असल्याने सध्या शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.
काळे झेंडे दाखविणार्यांना मज्जाव
मुख्यमंत्री फडणवीस लासलगाव येथे जाण्याआधी त्यांना काळे झेंड दाखविणार्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. मुस्लीम समाजाला शासनाकडून अद्याप आरक्षण दिले जात नसल्यामुळे मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याच्या मार्गावर उभे राहून काळे झेंडे दाखवित ध्यानाकर्षण आंदोलन केले जाणार होते; मात्र याची माहिती मिळताच भद्रकाली पोलीसांनी चौक मंडई येथूनच आंदोलनस्थळी निघालेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले.