बुलडाणा : बुलडाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेपूर्वी काँग्रेस, मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झाला. त्यांनतर प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. वाद टोकाला गेल्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर खुर्च्या फेकण्यात आल्या. काँग्रेस आणि मनसे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडेही दाखवले. या प्रकारामुळे परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
दोन गटात खुर्च्यांची फेकाफेक
रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे सभा होती. बळीराजा जलसंजीवनी योजनेचा शुभारंभ आणि राष्ट्रीय महामार्गाचेही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात येणार होते. यावेळी काँग्रेस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री सभेला येण्यापूर्वी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले. दोन गट आमनेसामने आल्याने त्यांच्यात खुर्च्यांची फेकाफेक सुरू झाली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण शांत झाले. त्यानंतर मुख्यमंत्री सभास्थळी आल्यानंतरही आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखविले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.