मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई -भूमिपुजन

0

शिंदखेडा। मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रयत्नाने मंजुर झालेल्या 21 कोटी रूपयांच्या कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजनेचे ई भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी शिंदखेडेकर नागरिकांनी टाळ्या वाजवून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. बिजासनी मंगल कार्यालयात माजी सभापती प्रा.सुरेश देसले, नगरपंचायत गटनेते माजी सरपंच अनिल वानखेडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष कामराज निकम, नगराध्यक्षा शहनाज बागवान, उपनगराध्यक्ष दिपक देसले, बांधकाम सभापती उल्हास देशमुख पाणी पुरवठा सभापती तुकाराम माळी, शिवसेनेचे युवराज माळी, नगरसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

अशी आहे योजना
शिंदखेडा शहरासाठी असलेली योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत मंजूर झाली आहे. 21 कोटी हजार 108 रुपयांची योजना आहे. सन 2016 मध्ये असलेली शहराची लोकसंख्या लक्षात घेवून पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेत शासनाचा निधी 90 टक्के म्हणजे 18 कोटी 90 लाख 8 हजार 197 रूपये तर नगरपंचायतीच्या हिस्सा 2 कोटी 10 लाख 910 रुपये आहे. या योजनेमध्ये इनटेक बेल, इन्सोक्शन बेल, कनेक्टींग मेन जॅकवेल, अशुद्ध व शुद्ध पाण्याचे पंप आणि वाहिनी 7 दशलक्ष लीटर प्रतिदिवस क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, जोडपूल, 7 व 6 लक्ष लीटर क्षमतेचे दोन जलकुुंभ , वितरण व्यवस्था, विद्युत जोडणी, योजनेची चाचणी, जाळीचे कुंपन, जोड रस्ता या कामांचा समावेश आहे. या योजनेसाठी पाण्याचा मुख्य स्त्रोत तापी नदीवरल हुलवाडे सिंचन प्रकल्प आहे.

पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रयत्नांना यश : शिंदखेडा शहरासाठी कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना व्हावी यासाठी माजी आ.ठाणसिंग जिभाऊ, माजी आ. द.वा.पाटील यांनी प्रयत्न केला मात्र आज अखेर ना.जयकुमार रावल यांच्या प्रयत्नाने योजनो मंजूर झाल्याचे माजी सभापती सुरेश देसले यांनी सांगितले. निवडणुकीनंतरचा राजकीय द्वेष व मत्सर विसरून निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांनी एकत्र येवून योजना होण्याबाबतचा पाठपुरावा केला व एकीचे बळाला यश मिळाले, अशी भावना प्रा.देसले यांनी व्यक्त केली. यापुढी पाण्यासाठी शिंदखेड्यात कधीही हंडामोर्चा निघणार नाही अशी ग्वाही यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमास शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्टचे विद्यमान चेअरमन डॉ.रमेश देसले, भाजपाचे किरण चौधरी, दादा मराठे, मुख्याधिकारी अजित निकम, उपअभियंता व्ही.के.सूर्यवंशी, सहाय्यक अभियंता पी.बी.देवरे, भिला पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना
गुरूवारी सकाळी 11 वा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील विविध योजनांचे इ उद्घाटन करण्यात आले. त्यात शिंदखेडा येथील कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजनेचा समावेश आहे. या योजनेसाठी 21 कोटी रूपये निधी राज्याचे पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांच्या प्रयत्नाने मंजुर झाला आहे. पाणी टंचाईचा तीव्र सामना करणार्‍या शिंदखेडावासियांची कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना व्हावी, अशी मागणी होती ती आज पूर्ण होत आहे, अशी भावना शिंदखेडेकर नागरिकांनी व्यक्त केली. यावेळी ना.रावल यांचे खंदे समर्थक व जि.प.सदस्य व भाजपाचे तालुकाध्यक्ष कामराज निकम यांनी या योजनेचे वर्कऑर्डस् येत्या काही दिवसातच घेवून पावसाळ्यापुर्वीच या योजनेचा लाभ शिंदखेडावासियांना घेता येईल, असा आत्मविश्‍वास व्यक्त केला.