भुसावळ – शिक्षकदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही क्रांतीज्योती सावित्रीमाई राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात जळगाव तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेचे पदवीधर शिक्षक डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील यांना हा पुरस्कार मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
मुंबई येथील नरिमन पॉईंट परिसरातील टाटा सेंटरमध्ये हा पुरस्कार प्रदान सोहळा दि. 5 सप्टेंबर 2023 रोजी पार पडला. सोहळ्यास मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधानसभा अध्यक्ष अॅड. ना. राहूल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री ना. दिपक केसरकर, आमदार कपिल पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार प्रताप सरनाईक, प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची उपस्थिती होती. या नऊ मान्यवरांच्या हस्ते बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. पाटील यांनी आतापर्यंत केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शासन निर्णयाला अनुसरून असलेल्या निकषांच्या आधारे जिल्हा व राज्य पातळीवर झालेल्या मुलाखती दरम्यान त्यांची निवड राज्य पुरस्कारासाठी करण्यात आली. राज्य शासनाचा पुरस्कार मिळाल्याने डॉ. जगदीश पाटील यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विविध संस्था व संघटनांतर्फे सत्कार करण्यात येत आहे.
फोटो ओळी – डॉ. जगदीश पाटील यांना राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करताना मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधानसभा अध्यक्ष अॅड. ना. राहूल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री ना. दिपक केसरकर, आ. कपिल पाटील, आ. विक्रम काळे, आ. प्रताप सरनाईक, प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे आदी.