मुख्यमंत्र्यांना पुण्याच्या विकासात रस नाही!

0

हडपसर । भाजपने पुणे शहराचा कचरा आणून हडपसरला मातीत घातले. हडपसरला मेट्रो, रिंगरोड, पुरेसे पाणी या पायाभूत सुविधांपासून दूर ठेवले. पालिकेत केवळ तोडपाणी सुरू आहे. स्मार्ट सिटीची घोषणा केवळ कागदावरच आहे. पालकमंत्र्यांनी या शहरासाठी काहीही केलेले नाही. ते केवळ पुणेकरांची फसवणूक करत आहेत. मुख्यमंत्र्यांचे नागपूरकडे लक्ष आहे. त्यांना पुण्याच्या विकासात रस नाही, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

हडपसर विधानसभा मतदार संघाच्यावतीने आयोजीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पवार बोलत होते. याप्रसंगी खासदार वंदना चव्हाण, आमदार अ‍ॅड. जयदेव गायकवाड, विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, पुणे शहर महिला अध्यक्षा रूपाली चाकणकर, संगिता घुले, वैशाली बनकर, प्रशांत जगताप, आनंद आलकुंटे, रत्नप्रभा जगताप, योगेश ससाणे, हेमलता मगर आदी मान्यवर उपस्थित होते.

मतदारांशी संवाद साधणार
हडपसर मतदार संघात सर्वाधिक नगरसेवक राष्ट्रवादी पक्षाचे निवडून आले आहेत. पक्ष वाढविण्यासाठी हडपसर विधानसभा मतदार संघात 10 हजार 25 कार्यकर्ते नेमण्यात येणार आहेत. त्यांनी प्रत्येक मतदारांशी संवाद साधण्याचे नियोजन केले आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक घरात व तळागाळात जाऊन काम करणार आहेत, असे चेतन तुपे यांनी सांगितले.