पुणे । राज्य हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा करणार्या मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थितीची जाणीव नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. मुख्यमंत्र्यांची हागणदारीमुक्तची घोषणा म्हणजे दुरून डोंगर साजरे असल्याचेही सुळे म्हणाल्या. रविवारी जागतिक वसुंधरा दिनी पुण्यातील तळजाई टेकडीवर सुळे यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.
नगरसेवकांचीही उपस्थिती
तळजाई टेकडीवरील या समस्यांचे निराकरण करायचे असेल, तर येथे येणार्या नागरिकांनी पुढाकार घेऊन समिती स्थापन करायला हवी. या समितीच्या माध्यमातून कालबाह्य कार्यक्रम आखून एका वर्षाने त्याचा आढावा घेतला गेला पाहिजे, असे सुळे यावेळी म्हणाल्या. खासदार म्हणून यामध्ये आपणही सहभागी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांच्या या भेटीदरम्यान खासदार वंदना चव्हाण यांच्यासह नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
रस्त्याने नाही, हेलीकॉप्टरने फिरतात
गेल्या तीन-साडेतीन वर्षांमध्ये सरकारने केलेल्या कामांमुळे राज्य हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यांच्या या दाव्याचा सुळे यांनी समाचार घेतला. वास्तविक राज्य हागणदारीमुक्तची योजना राष्ट्रवादीचे नेते दिवंगत आर. आर. पाटील यांनी सुरू केल्याचे सुळे यावेळी म्हणाल्या. मुख्यमंत्री रस्त्याने नाही, तर हेलीकॉप्टरने फिरतात. त्यामुळे त्यांना वास्तविकता माहित नसल्याचा टोलादेखील सुळेंनी लगावला.
नागरीकांशी संवाद साधला
रविवारी सकाळी 7 वाजता सुप्रिया सुळे यांनी तळजाई टेकडीवर हजेरी लावली. टेकडीवर फेरफटका मारत येथील परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. सुळे यांच्या मतदारसंघातील हा भाग आहे. त्यांच्या टेकडी भेटीदरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. झाडांची सातत्याने होणारी कत्तल, टेकडीवर मोठ्या संख्येने असलेले मोर आणि ससे यांच्या सुरक्षेचा प्रश्न, पार्किंग व्यवस्था, उन्हाळ्यात टेकडीवर पाण्याची नसलेली सोय, दुरावस्थेत असलेला वॉकिंग ट्रॅक यासह अनेक समस्या यावेळी नागरिकांनी सुळे यांच्याकडे मांडल्या.