नागपूर : आज गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या चर्चेला उत्तर दिले. उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांनी केलेल्या चर्चेला जोरदार उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी भाजपने केलेल्या सर्व आरोपांवर उत्तर दिले आहे. भाजपला आणि विशेषत: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच लक्ष केले. मुख्यमंत्र्यांच्या या भाषणावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विसरले होते की, ते विधानसभेत आहेत म्हणून त्यांनी शिवाजी पार्कवरील भाषण केले, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.
या सरकारने आज शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकही घोषणा केली नाही. पहिल्याच अधिवेशनात या सरकारने दिलेले वचन पाळले नाही म्हणून आम्ही सभात्याग केला’ असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री उत्तर देतील त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी अपेक्षा होती. पण त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीचा विषय काढला नाही. त्यासोबतच मराठा आरक्षण अशा मुद्द्यांनाही त्यांनी बगल दिली, असेही फडणवीस म्हणाले. हे विश्वासघातकी सरकार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिले मुख्यमंत्री असतील ज्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर काही उत्तरे दिलेले नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.