मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी सोडले उपोषण

0

जळगाव। भु सावळ-जळगाव या तिसर्‍या रेल्वेलाईनसाठी तरसोद, नशिराबाद, आसोदा या गावातील संपादित जमीन भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी शेतकरी गेल्या सहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. सोमवारी 10 पासून 58 शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत. कायद्यानुसार भूसंपदानाचा मोबदला मिळावा अशी मागणी शेतकर्‍यांची होती. रेल्वे प्रशासनानाचा होकार असतांना महसूल विभागाने नकार दर्शविल्याने शेतकर्‍यांनी कुटुंबीयांसह आमरण उपोषण सुरु केले होते. माजीमहसुलमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी संबंधीत प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष उपोषणकर्त्यांशी भ्रमणध्वनीवरुन संवाद साधत मोबदला मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर उपोषण सोडण्यात आले.

प्रधान सचिवांना आदेश
आमदार एकनाथराव खडसे यांनी भुसावळ-जळगाव रेल्वेमार्गासाठी करण्यात आलेल्या भुसंपादनाची तसेच उपोषणकर्त्यांच्या भुमिकेची वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत राज्याचे प्रधान सचिव सिताराम कुंठे यांना अहवालाची शहानिशा करुन भुसंपादनासंबंधी करण्यात आलेला निवाडा (अवार्ड) रद्द करुन नवीन कायद्यानुसार जमीनीचा मोबदला देण्याचे आदेश दिले. निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रधान सचिव यांना भुसंपदनाचा अहवाला पाठविला आहे.

उपोषणादरम्यान यांनी दिली भेट
सहकार राज्यमंत्री नामदार गुलाबराव पाटील, पर्यावरणमंत्री रामदास कदम, माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार ए.टी.पाटील, आमदार डॉ.सतीष पाटील, माजी आमदार गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार राजीव देशमुख, माजी आमदार गुरुमुख जगवाणी यांनी भेट दिली होती.

शेतकर्‍यांवर अन्याय झाल्याने मी स्वतः मुख्यमंत्री यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थिती समजविल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपोषणकर्त्यांना आश्‍वासन देत उपोषण सोडण्याची विनंती केली. अन्याय कारक भुसंपादन करण्यात आले होते. एकीकडे भुसंपादनासाठी पावणे तीन कोटी मोबदला देतात आणि एकीकडे केवळ पावणे तीन लाख मोबदला देतात हे अन्याय कारक आहे. शेतकर्‍यांना न्याय मिळाला पाहिजे. -माजीमंत्री आमदार एकनाथराव खडसे

खडसेंनी केले होते समोरासमोर
शेतजमीनीचे भुसंपादन करण्यात आल्यानंतरही शेतकर्‍यांना मोबदला देण्यात आलेला नसल्याने शेतकर्‍यांनी उपोषण सुरु केले. उपोषण प्रसंगी भेट देतांना आमदार एकनाथराव खडसे यांनी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर आणि रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) आर.के.यादव यांना बोलावून दोन्ही अधिकार्‍यांशी समोरासमोर चर्चा केली. तसेच मोबदला देण्यास काय अडचण आहे यांची माहिती घेतली.