मुंबई: मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या आपात्कालीन विभागात जाऊन मान्सून परिस्थितीची पाहणी केली. पालिका आयुक्त प्रविण परदेशी यांच्याकडून मुंबईतील व्यवस्थापनाचा आढावा मुख्यमंत्र्यांना दिला. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. मुंबईकरांच्या सुविधेसाठी हेल्पलाईन सुरु आहे. याठिकाणी अनेक तक्रारींचे फोन येत असतात. सीसीटीव्हीच्या माध्यमातून शहरातील कानाकोपऱ्याचा आढावा एकाच छताखाली घेतला जातो. .
पावसामुळे वाकोला, साकीनाका अशा पोलीस ठाण्यातही पाणी घुसलं आहे. हवामान खात्याने मुंबईत पुढील काही तास जोरदार पाऊस पडण्याचा इशारा दिल्याने अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मालाड येथील दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. संपूर्ण जून महिन्यात मुंबईकर पावसाची प्रतिक्षा करत होते. मात्र एक महिन्याच्या विलंबानंतर आलेल्या पावसाने अवघ्या 2 दोन दिवसांत मुंबईकरांनी दैना केली आहे. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचलं असून, उपनगरीय रेल्वे सेवा मंदावली आहे. पुढच्या दोन दिवसात मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पावसामुळे हिंदमाता, किंग्ज सर्कलमध्ये यांसारख्या सखल भागात पाणी साचलं आहे. कुर्ला येथे रहिवाशांच्या घरात पाणी घुसल्याने तेथे भारतीय नौदलाला पाचरण करण्यात आलं आहे.