मुंबई – विरोधात असताना खोटे बोलून सत्तेवर आलात. शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येचे भांडवल करून सत्ता मिळवली. मुख्यमंत्र्यांनी आता शक्य असेल तर उद्या कर्जमाफी जाहीर करावी किंवा शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या संपाला म्हणण्यापेक्षा त्यांच्या भावनेला आपला पाठिंबा आहे. मात्र, हा दोन-चार दिवसांत विझता कामा नये, असेही ते म्हणाले.
तिजोरीत खडखडाट
या सरकारकडे पैसेच नाहीत. विरोधात असताना हे ठाऊक नव्हे का? पण, खोटे बोलून सत्तेत यायचे आणि पुन्हा खोटे बोलायचे हा यांचा कार्यक्रम आहे. आज शेतकरी, उद्या आणखी कोणी संपावर जाईल. पण, त्याने प्रश्न सुटणार का, हे महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काय झाले? वाट्टेल त्या घोषणा करायच्या. आता पूर्ण करता येत नाहीत. शेतकरी संपावर गेले. उद्या महाराष्ट्र बंद कराल. पण, यातून बाहेर काय पडणार, असा सवालही त्यांनी केला.
अण्णांची मध्यस्थी मान्य
अण्णा हजारेंनी मध्यस्थी करायला काही हरकत नाही. कोणाच्याही वहाणेने विंचू मेला तर काय हरकत आहे? कोणीही मध्यस्थी करा पण प्रश्न सोडवा, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या संपाच्या विषयावर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस .यांची भेट घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना भेटून काय करायचे? गंभीर चेहरा घेऊन तेथे जायचे. बिल्कूल करू, बिल्कूल करू, असे ऐकायचे का, असा सवाल त्यांनी केला.
शहिदांच्या कुटुंबियांसाठी स्टँड उभारा
सीमेवर जवान मरत असताना आपण आपले भारत-पाकिस्तानमधली क्रिकेट मॅच बघण्यात धन्यता मानतो, याला काय म्हणावे? कोणत्याही क्षणी काय होईल हे माहित नाही, अशा परिस्थितीत जवान सीमेवर लढत असताना आपण भारत-पाकची क्रिकेट मॅच बघतो. त्याला काय वाटत असेल. आता एक करा. मॅचसाठी शहिदांच्या कुटुंबियांसाठी स्टेडियममध्ये एक स्टँडही उभारा, असेही राज ठाकरे म्हणाले.
शिवसेनेचे काम फक्त अंडे उबवायचे
शिवसेनेबद्दल काय बोलावे? ते कोठे आहेत हेच कळत नाही. नुसती अंडी उबवायची. सकाळी वाकून बघायचे- नवीन अंडे पडले का, असेही राज म्हणाले.