मुंबई : राज्यातील 30 लाख शेतकरी कर्जाच्या परिघाबाहेर गेलेले आहेत. त्यांच्यासाठी कर्जाची योजना तयार करा. मागेल त्याला कर्ज देऊ अशी व्यवस्था तयार करायची, प्रत्येकाला कर्ज मिळाले पाहिजे. त्यासाठी आपल्या भागात कर्ज मेळावे घ्या. पालकमंत्री आणि जिल्हाधिकार्यांनी याकडे लक्ष द्यावे. येत्या दोन महिन्यात जलयुक्त शिवार आणि शेततळची कामे पूर्ण करा, पाण्याचे नियोजन, पिकांचे प्लॅनिंग करा यासाठी कृषिमंत्री, पालकमंत्री जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे अश्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या राज्यस्तरीय हंगामपूर्व बैठकीत दिल्या.
खरीप हंगामाचे नियोजन करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गेल्या वर्षी 40 हजार कोटी शेती क्षेत्रातले उत्पन्न वाढले आहे. गेल्या 10 वर्षातील रेकॉर्ड तोडला आहे. कृषी विभागाचे अभिनंदन करताना, विपरीत परिस्थितीत शेतकर्यांनी केलेल्या मेहनतीवर इतके उत्पन्न वाढल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांचेही आभार मानले. शेतकर्यांच्या पीक कर्ज वाटपाचा आढावा घेत असताना त्यांनी सहकार विभागाला सूचना दिल्या. 10 ते 12 जिल्हा बँकांचे ग्रामीण भागात जाळे मोठे आहे. त्याचा उपयोग करून कमर्शियल बँकांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या बँकांना एजंट बनवून टार्गेट पूर्ण करावेत. जिल्हा बँका डबघाईला आल्याने पीक कर्ज वाटपाचे लक्ष्य पूर्ण होत नाही. यातून मार्ग काढण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. आपल्या विभागात कोणती पिके घेतली पाहिजेत त्याचे प्लॅनिंग करा, कृषी अधिकार्यांनी, विभागीय आयुक्त आणि संबंधित अधिकार्यांशी चर्चा करून शेतकर्यांना सल्ला आणि सूचना कराव्यात. शेतकर्यांची मदत करणे हे आपले कर्तव्य आहे, त्यासाठी अविश्रांत काम करा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. दुबार पेरणीची वेळ येणार नाही याचे नियोजन करा. हलक्या प्रतीच्या जमिनीत कापसाचे पीक घेऊ नका, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तुरीसारख्या पिकांसाठी यंदाच्या वर्षी शाश्वत मॉडेल तयार करू. दोन महिन्यात जलयुक्त शिवाराची कामे, मागेल त्याला शेततळे आणि विहिरीची कामे पूर्ण झाली पाहिजेत. यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. मात्र वॉटर स्ट्रक्चर तयार करण्यासाठी मिशन मोडमध्ये कामे झाली पाहिजेत, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. कृषी आणि पणन विभागाने स्टोरेज आणि फूड प्रोसेसिंगसाठी जास्तीत काम केलं पाहिजे. शेतकर्यांना चांगला भाव देण्यासाठी या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
…तर दुष्काळाचा आराखडा तयार करा
दुष्काळाची वेळ आली तर त्याचा सामना करण्यासाठी आतापासूनच जिल्हाधिकार्यांनी आराखडा तयार करून ठेवा. चारा टंचाई, पाणी कमी आले तर कुठले पाणी कमी-जास्त करायचे या सगळ्याचे नियोजन हवे त्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.