मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली बैठक पुन्हा झाली रद्द!

0

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) – 425 कोटींच्या रस्ते विकासकामात 90 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, विरोधकांकडून केला जात आहे. यामध्ये रिंग केली असून यातून करदात्यांच्या 90 कोटींची लूट झाल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार होत आहे. तसेच भाजपच्या खासदारांनीदेखील याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केल्यामुळे भाजपवर जोरदार आरोप होत आहेत. यावरुन भाजपच्या खासदार आणि स्थायी समितीच्या अध्यक्षांमध्ये चांगलीच जुंपली आहे. भ्रष्टाचार प्रकरणाची शहानिशा करुन वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी वर्षा बंगल्यावर बोलविलेली बैठक रद्द झाली आहे. बैठक का रद्द करण्यात आली. याचे नेमकी माहिती समजू शकली नाही.

भाजप खासदारांनीच केली होती मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सत्ताकारणात वर्चस्ववादाची लढाई सुरु झाली आहे. सत्तासंघर्षावरुन पदाधिकार्‍यांमध्ये नेहमीच सुंदोपसुंदी सुरु असते. विविध विकासकामात गैरव्यवहार होत असल्याचे, आरोप सत्ताधार्‍यांवर जोर धरत आहेत. 425 कोटींच्या रस्ते विकासाच्या कामात तर 90 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वारंवार होत आहे. तसेच सत्ताधार्‍यांसह याप्रकरणात आयुक्तांवरदेखील गंभीर आरोप होत आहेत. राष्ट्रवादी, शिवसेनेने यावरुन रान उठविले आहे. त्यामुळे राज्यभरात पक्षाची नाचक्की होत आहे. त्यातच भाजपच्याच खासदाराने भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे याप्रकरणात लक्ष घालण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली होती. खासदारांच्या पत्राची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी रस्ते विकासाच्या कामाचा अहवाल मागविला आहे. खासदारांनी चौकशीची मागणी केल्यामुळे स्थायी समिती अध्यक्षा व खासदार यांच्यात शीतयुद्धच पेटल्याचे चित्र आहे.

बैठक का रद्द झाली?
425 कोटींच्या रस्ते विकासकामात 90 कोटींचा भ्रष्टाचार झाल्या असल्याच्या आरोपाची शहानिशा करण्यासाठी आणि पदाधिकार्‍यांमधील वादावर पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर शनिवारी रात्री बैठक बोलविली होती. परंतु, अचानक ती बैठक रद्द करण्यात आली आहे. बैठक का रद्द केली हे स्पष्ट होऊ शकले नाही. यापूर्वी 16 जानेवारीलाच बैठक बोलविली होती. परंतु, काही कारणास्तव ती लांबणीवर गेली होती. त्यामुळे भाजपच्या बैठकीला काही मुहूर्त मिळेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.