पालघर-ऑडिओ क्लिपबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा. क्लिप खरी असेल तर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेतील वाद टोकाला पोहोचला असून शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप ऐकवली. या क्लिपमध्ये मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला ‘जशास तसे उत्तर द्यावे’ असे म्हटले होते. साम, दाम, दंड, भेदाचा वापर केला पाहिजे. अरे ला कारे करायचं. ‘अरे ला कारे’ मध्येच उत्तर द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे’, असे या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले होते.
उध्दव ठाकरेंवर कारवाई करावी
शिवसेनेने ऑडिओ क्लिप जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ‘निवडणुक आयोगाने याप्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी. क्लिप खरी असेल तर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा. क्लिप खोटी असेल तर उध्दव ठाकरे यांच्यावर कारवाई करावी’, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा शनिवारी अखेरचा दिवस आहे. प्रचारासाठी सर्वच प्रक्षाचे मातब्बर नेते वसई-विरारसह पालघर मतदारसंघात तळ ठोकून असून राजकीय पक्षांकडे दोन दिवस असल्याने मतदानासंबंधी रणनीती आखण्यावर ते भर देणार असल्याचे समजते. पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवार, २८ मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघात पंचरंगी लढत होणार आहे.