मुख्यमंत्र्यांनी संमती दिली तर मंत्रिमंडळाचा विस्तार: अजित पवार

0

नागपूर: राज्यात महाआघाडी सरकार स्थापन होवून २१ दिवस झाले असून, आतापर्यंत मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली तर २३ तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे सुतोवाच दिले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी सर्व विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांची बैठक घेतली होती. या बैठकीत अधिवेशन संपेपर्यंत ६ मंत्री कामकाज पाहणार असणार असल्याचे सांगितले.

तसेच अजित पवारांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात मत व्यक्त केलं आहे. या कायद्याबद्दल दोन मतप्रवाह आहेत. काहींचे म्हणणं आहे केंद्राने मंजुरी दिल्यानंतर राज्याच्या मंजुरीची गरज नाही. तर दुसरीकडे राज्याच्या मंजुरीची गरज असल्याचंही सांगितलं जात आहे. दोन दिवसांत नागपूरचं अधिवेशन संपेल. मुंबईला जाऊन ऍडव्होकेट जनरलकडून यासंदर्भात मार्गदर्शन घेऊ. हा कायदा लागू करण्यासंदर्भात माहिती पूर्ण घेतल्याशिवाय बोलणं योग्य ठरणार नसल्याचंही अजितदादांनी स्पष्ट केलं आहे.

काल काँग्रेसचे प्रमुख नेते नागपुरात मुक्कामाला आलेले आहेत. मुख्यमंत्री आणि पवार साहेबांची भेट दुपारी ठरलेली आहे. भेट झाल्यानंतर पवारसाहेब औरंगाबादला जातील. पवारसाहेबांचा औरंगाबादला कार्यक्रम आहे. कर्जमाफीसंदर्भात काल बैठक होणार होती, पण ती काल होऊ शकली नाही. राज्याची आर्थिक परिस्थिती, उत्पन्नाचे स्रोत, जीएसटीचा हिस्सा या सगळ्या गोष्टी पाहूनच कर्जमाफी करावी लागणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.