मुख्यमंत्र्यांनी सहनशीलता संपण्याआधी निर्णय घ्यावा!

0

नारायण राणे यांची अगतिकता; नाणार प्रकल्पावरून शिवसेनेवर जोरदार शरसंधान

मुंबई :- काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना करत भाजपप्रणित एनडीएध्ये दाखल झालेल्या नारायण राणे यांच्या सहनशीलतेचा बांध हळूहळू फुटत चालला आहे. जवळपास ३ महिने झाले तरी राणे यांना मंत्रीपदाचे आश्वासन देऊन पदापासून वंचित ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत राणे यांनी सहनशिलता संपण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा, असा धमकीवजा इशारा भाजप नेतृत्वाला दिला आहे. राणे यांना भाजप कोट्यातून मंत्री करणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळा सांगितले. त्यानंतर राणे यांनी मंत्रीपदाचा मुहूर्त स्वत:च जाहीर केला होता. मात्र जाहीर केलेल्या मुहूर्तावर राणे यांचा शपथविधी झालाच नाही. शिवाय विधानपरिषदेच्या झालेल्या पोटनिवडणुकीत राणे यांना उमेदवारीही नाकारण्यात आली. त्यामुळे राणेंची अस्वस्थता वाढत चालली आहे.

राज्य शासनाची दडपशाही सुरु
रत्नागिरी जिल्ह्यातील येथील प्रस्तावित नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी शेतकऱ्यांवर राज्य शासनाची दडपशाही सुरु असून धमकावून त्यांच्याकडून जमिनी संपादन करण्याचा प्रकार सुरु असल्याचा खळबळजनक आरोप राणे यांनी केला. नाणार प्रकल्पात शिवसेनेचे पदाधिकारी दलाली करत असल्याचा आरोप यावेळी राणे यांनी केला. खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांनी जमिनी घेतल्याची माहिती असल्याचे सांगत महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचा शिवसेनेच्या विरोधाला विरोध असून आम्ही नानार प्रकल्प होऊ देणार नाही असेही राणे यावेळी म्हणाले. राणे म्हणाले की प्रकल्पग्रस्तांना अधिकाऱ्यांनी दम दिल्यास त्यांच्याविरोधात केसेस दाखल करू. काहीही झाले तरी कोकणवासीयांचा ऱ्हास करणारा प्रकल्प मी होऊ देणार नाही, अशा शब्दात राणे यांनी इशारा दिला. राणे पुढे म्हणाले की, अणुऊर्जा प्रकल्पाचा अभ्यास करून जेव्हा पर्यावरण विरोधी नसल्याचे पटले तेव्हा मी स्वतः मान्यता दिली. मात्र इंडस्ट्रीयल कॉरिडॉर मी उद्योग मंत्री असतांना जरी झाला असला तरी आज मी स्थानिकांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे सांगत मी मुख्यमंत्र्यांकडे हा विषय घेऊनच जाणार आहे, असे राणे म्हणाले.

प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना मातोश्रीवर धमक्या
-नारायण राणे म्हणाले, भाजपने हा प्रकल्प आणल्याचे शिवसेना सांगते. मात्र, राज्याचे आणि केंद्रातील उद्योग मंत्री हे शिवसेनेचे आहेत. त्यामुळे एका बाजूला विरोध दाखवायचा आणि दुसऱ्या बाजूला लोकांना प्रकल्पाच्या जमीनीसाठी धमकावले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई हे शिवसेनेचे आहेत. तसेच केंद्रातील अवजड व उद्योगमंत्री अनंत गिते हे देखील शिवसेनेचेच आहेत. या मंत्र्यांना सांगून उद्धव ठाकरे यांनी हा प्रकल्प का रोखला नाही असा सवाल राणेंनी यावेळी केला. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे अशोक वालम यांना उद्धव ठाकरेंनी मातोश्री या आपल्या निवासस्थानी बोलावून त्यांना धमकावल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकल्पाविरोधात पुढाकार घेऊ नये असे त्यांना मातोश्रीवर सांगण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. वालम आणि त्यांच्या पत्नीवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तसेच माघार घेण्यासाठी पोलिसांनी त्यांचा छळ केल्याचा आरोपही नारायण राणे यांनी केला आहे. या त्रासाला कंटाळून वालम सध्या मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगताना राणे यांनी वालम यांना दिलेले धमकीचे पत्रही पत्रकार परिषदेत सादर केले. नाणार परिसरातील १६ गावातील लोकांची या प्रकल्पाला संमती नाही. या ग्रामस्थांनी आम्हाला पॅकेज नको असे शासनाला सांगितल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.