भूवनेश्वर । ओडिशा सरकारने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी याबाबत घोषणा केली. त्यानुसार, ओडिशामध्ये 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. 17 जूनपर्यंत ओडिशातील शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात येणार आहे. याचबरोबर 30 एप्रिलपर्यंत देशातील विमानसेवा, रेल्वे सेवा सुरू करू नये, अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेणारे ओडिशा हे देशातील पहिले राज्य आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन घोषित केला होता. लॉकडाऊनला 14 दिवस पूर्ण झाले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे लॉकडाऊनच्या काळात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्रासह इतर काही राज्यातील परिस्थिती कोरोनाच्या संसर्गामुळे गंभीर होत चालली आहे. लॉकडाऊन संपायला सात दिवस शिल्लक असताना महाराष्ट्र, तेलगंणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, आसाम, छत्तीसगढ आणि झारखंड सरकारने लॉकडाऊन वाढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.