मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा

0

नवापूर । कर्जमुक्ती ऑफलाइन फॉर्म भरण्याचे सर्व्हर 10 सष्टेंबरपासुन जाणूनबुजून बंद केल्यामुळे तसेच खोटी कर्जमुक्ती जाहीर करुन शेतकर्‍यांची फसवणुक केल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा याबाबतचे निवेदन तहसिलदार प्रमोद वसावे यांना निवेदन सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांचा तर्फे देण्यात आले आहे. त्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रात दरवर्षी दुष्काळग्रस्त नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच सरकारच्या उदासीनतेमुळे हजारो शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतांना दिसत असल्यामुळे शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकर्‍यांनी, रास्तारोको केला. यामुळे शेवटी महाराष्ट्र सरकारला कर्जमुक्तीची घोषणा करावी लागली.परंतु मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कसा कर्जमुक्तीपासुन दुर फेकला जाईल याच्याकडे जास्त जोर दिल्याचे दिसत असल्याचा आरोप केला आहे.

जाचक अटींमुळे शेतकरी वंचित
शासनाकडून कर्जमुक्तीसाठी अटी-नियम लावण्यात आले आहेत. या अटी-नियमांमुळे हजारो शेतकरी या योजनेपासुन दुर फेकले गेले आहेत. पुन्हा एकदा शेतकर्‍यांना रस्त्यांवर उतरावे लागले असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. दिड लाखपर्यंतची कर्जमुक्तीसाठी ऑफलाइन फार्म भरण्याचे जाहीर केल्यानंतर त्या दिवसापासुन कधी सर्व्हर बंद तर कधी लाईट बंद असल्यामुळे शेतकर्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अगोदरच शेतकरी कर्जबाजारी झालेला असतांना परत रोज-रोज तालुक्याच्या ठिकाणी चकरा मारणे यामुळे धड कर्जमुक्तीचे फॉर्म भरलेले नाहीत.

तीन दिवसांपासून सर्व्हर बंद
या धावपळीत शेतातील पिकांकडे लक्ष नाही. त्यामुळे कर्जमुक्ती तर दुरच पण हातातला घास सुध्दा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या 11 तारखेपासुन सर्व्हर बंद आहे आणि 15 तारखेला मुदत संपत असल्यामुळे हजारो शेतकरी या योजनेपासुन दुर फेकले जाण्याची शक्यता आहे. यामुळे नंदुरबार जिल्हयातील सुमारे 1200 शेतकरी व महाराष्ट्रात 10 लाख शेतकर्‍यांवर ऑफ लाईन फॉर्म भरण्यासाठी अडथळा निर्माण करणार्‍या तसेच जाणुन बुजुन सर्व्हर बंद करणे,लोडशेडींग यामुळे हजारो शेतकयांची फसवणुक करणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर फौजदारी गुन्हा दाखल करुन शेतकर्‍यांना न्याय द्या अन्यथा सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यांची दक्षता घ्यावी असे निवेदनामध्ये म्हटले आहे. निवेदनावर कॉ.आर.टी. गावीत, कॉ.जगन गावीत,कॉ.रमेश गावीत,कॉ.भिमा गावीत, कॉ.जेण्या गावीत,सुमन गावीत आदीचा सह्या आहेत.

शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक
वारंवार ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत असल्याने शेतकर्‍यांचे शेतीकडे लक्ष देता येत नाही. यातच ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी जावूनही अर्ज न भरता आल्याने दुहेरी नुकसान सोसावे लागत आहे. शेतीकडे पुरेसे लक्ष देता येत नाही व तालुक्याला जावूनही अर्ज भरता येत नाही. तांत्रीक अडचण निर्माण झालेली असतांना ती अडचण दूर करण्यात कोणीही पुढाकार घेतांना दिसत नाही. यातून शेतकर्‍यांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होत आहे. मुख्यमंत्री यातून शेतकर्‍यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेद्वारे करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी ऑफलाइन फॉर्म भरण्याची योजना जाहीर केली परंतु ती यशस्वीपणे राबविण्याकडे दुर्लक्ष केला असल्याचे सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेने म्हटले आहे.