राळेगणसिद्धी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राळेगणसिद्धी येथील जाहीरसभेत एका मूकबधीर तरुणाने त्यांच्या दिशेने पाण्याची बाटली भिरकावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुरक्षा कवच भेदून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणार्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रशांत कानडे (वय 25) असे या तरुणाचे नाव असून, त्याच्याकडून पाण्याची रिकामी बाटली जप्त करण्यात आली आहे. नोकरीबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी तो स्टेजच्या दिशेने पळत जात होता.
बाटलीफेकीमुळे सभेत गोंधळ
कृषिपंपांना बारा तास सलग वीज पुरवण्यासाठी राळेगणसिद्धीत दोन हजार मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते शनिवारी दुपारी पार पडले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि मंत्रिमंडळातील सहकार्यांसोबत त्यांनी या प्रकल्पाचा नारळ फोडला. त्यानंतर झालेली सभा बाटलीफेकीमुळे वादळी ठरली. प्रशांत हा मूकबधीर असून तो नोकरीसाठी प्रयत्न करत होता. बँकेत शिपाई पदावर नोकरी मिळावी यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र नोकरी मिळत नसल्याने तो हताश होता. नोकरीसाठी त्याने मुख्यमंत्री कार्यालयाला 10 महिन्यांपूर्वी निवेदनही दिले होते. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्याला उत्तर आले नव्हते.
बेरोजगारीमुळे प्रशांतच्या रागाचा उद्रेक
नगर तालुक्यातील मेहकरीचा रहिवासी असलेला प्रशांत कानडे दिव्यांग आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्याला रोजगार हवा आहे. त्याने बर्याच ठिकाणी प्रयत्न केला, पण मूकबधीर असल्याने त्याला कुणीच नोकरी दिली नाही. मुख्यमंत्री सचिवालयाकडून प्रतिसाद न मिळाल्याने प्रशांतच्या रागाचा आज उद्रेक झाला. जाहिरातींमधून मोठमोठे दावे करणारे राज्य सरकार दिव्यांगाना कसे वागवते, हे या घटनेतून समोर आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातील गोंधळाबाबत माहिती देताना पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे म्हणाले, सुरक्षा कवच भेदून मुख्यमंत्र्यांच्या जवळ जाणार्या तरुणाला आम्ही ताब्यात घेतले. सभेत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांवर शाईफेक झाल्याचे वृत्त खोटे असून पाण्याची बाटली भिरकावण्याचा प्रकार घडला आहे.