मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री दिल्ली वारीत व्यस्त : राज्यात मात्र शेतकर्यांचे हाल : एकनाथराव खडसेंच्या आरोपाने खळबळ
Former minister Eknathrao Khadse Said ; While The Farmers Sre Suffering From Floods, The Chief Minister is Busy In Delhi Wari यावल : राज्यात अति पावसाने पूरस्थिती तसेच शेतीची परीस्थिती गंभीर होत चालली असतांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दिल्ली वारी करण्यात व्यस्त आहेत तर राज्यातील जनता ही वार्यावर असल्याचे चित्र प्रथम पहावयास मिळत असल्याचा दावा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परीषदेत केल्याने खळबळ उडाली आहे.
तर जनतेच्या समस्या सुटल्या असत्या
आमदार एकनाथराव खडसे म्हणाले की, राज्यात 25 दिवस झाल्यानंतरही राज्याच्या मंत्री मंडळाचा विस्तार झालेला नाही. जर मंत्री मंडळ असते तर लोकांचे समस्या सुटण्यास मदत झाली असती. शासनाकडुन नुकसानग्रस्त जनतेला काही मदत करता आली असती तसे न होणे हे आपल्या राज्याचे दुदैव आहे. लोकप्रतिनिधी ही राज्याची परीस्थिती प्रभावीपणे मांडु शकतो, पण राज्यात मंत्री मंडळच नसल्याने प्रशासनाची जबाबदारी ही शासकीय अधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे. हे अधिकारी आपले काम त्यांच्या चाकोरीत राहुन काम करतात. सध्या महाराष्ट्रामध्ये अति पावसाने पूरस्थिती निर्माण झाली तसेच शेतकर्याचे प्रचंड नुकसान झाले मात्र अजूनही मंत्री मंडळ विस्तार नसल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीवारी करण्यात व्यस्त आहेत. सरकार त्यांच्या चाकोरीतून काम करते लोकप्रतिनिधी असले तर समस्या सुटतात, असेही खडसे म्हणाले.
निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन
आगामी नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परीषद निवडणुका संदर्भात त्यांना भूमिका विचारली असता त्यांनी कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्यासाठी तयारी करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले मात्र वरीष्ठ पातळीवर महाविकास आघाडीचा एकत्र लढण्याचा प्रस्ताव आल्यास त्या संदर्भात एकत्रीत बसून विचार करता येईल आणि ठरल्यानुसार निवडणूक लढता येईल. निवडणुकी या लागल्या आहेतच त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणत्याही क्षणी तयारीत तयार राहावे, अशा सुचना दिल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकत्यांची बैठकही घेतली
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, राष्ट्रवादी आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष एम.बी.तडवी, डॉ.हेमंत येवले, माजी नगरसेवक अताउल्ला खान, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष मोहसीन खान, बापू जासुद, युवक राष्ट्रवादीचे गोलु माळी आदी कार्यकर्ते उपास्थित होते. याप्रसंगी काँग्रेसचे माजी नगरसेवक समीर शेख मोमीन, माजी नगरसेवक अस्लम शेख नबी यांनी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांचे स्वागत केले.