महामार्ग क्र. 6 वर एकविरागार्डनसमोर ट्रकने तरुणाला चिरडले ; खोल साईडपट्टीमुळे तोल सावरतांना पडला रस्त्यावर ; दुचाकीचालक तरुण जखमी
जळगाव- मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे शुक्रवारी रोजी जिल्हा दौर्यावर येत आहेत. त्याच्या दौर्याच्या पार्श्वभूमिवर अनेक वर्षापासून महामार्गाला ग्रहण लागलेल्या खड्डे बुजविण्याचे काम गुरुवारी हाती घेण्यात आले. एकीकडे महामार्गाची डागडुजी होत असतांना याच महामार्गाच्या नादुरूस्त तसेच खोल साईडपट्ट्यांनी बांभोरी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा बळी घेतला आहे. सौरभ गोपालदास मनवानी वय 19 रा. भुसावळ असे मयत तरुणाचे नाव आहे. मित्रासोबत दुचाकीवर मागे बसून शहराकडे परतत असतांना आहुजानगरजवळील हॉटेल एकविराजवळ खोल साईटपट्टीत दुचाकी गेली अन् तोल जावून महामार्गावर पडल्यावर मागून येणार्या ट्रकने सौरभला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीस्वार सौरभचा मित्र तसेच बांभोरी महाविद्यालयाचाच विद्यार्थी हर्षल शांताराम सपकाळे वय 19 रा. बोदवड हा जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मित्राला दुचाकी चालविण्यासाठी देवून स्वतः मागे बसला
भुसावळ येथील हनुमान नगर सिंधी कॉलनी येथे सौरभ हा वडील गोपालदास आई, लक्ष्मी व लहान भाऊ स्वयम यांच्यासोबत वास्तव्यास होता. सौरभ हा बांभोरी अभियांत्रिकी कॉलेजमध्ये सिव्हील इंजिनिअरींगच्या दुसर्या वर्षाला शिक्षण घेत होता. त्यासाठी तो दुचाकीने भुसावळ येथून अपडाऊन करत होता. सौरभ नेहमीप्रमाणे गुरुवारीही सकाळी बांभोरी महाविद्यालयात आला होता. सायंकाळी कॉलेज संपल्यावर त्याच्या दुचाकीने (एम.एच. 19 डी.के. 8303) भुसावळला घरी जाण्यासाठी निघाला. यावेळी त्याच्या वर्गातील हर्षल सपकाळे हा वसतीगृहात राहणारा मित्र भेटला. हर्षलने सौरभला मलाही गावात यायचे आहे, असे सांगितले. यानंतर सौरभने त्याला दुचाकी चालवायचे सांगितले. व स्वतः मागे बसला.
नादुरुस्त साईडपट्टीने घेतला बळी
मुख्यमंत्री शुक्रवारी जिल्हा दौर्यावर असल्यामुळे महामार्गावर खड्डे बुजविण्याचे तसेच मलमपट्टी करण्याचे काम सुरु होती. अनेक वर्षापासून खड्डे असलेल्या महामार्गाच्या किमान खड्डयाचे भाग्य उजळले होते. महामार्गावरील सुरु असलेल्या कामासाठी वाहने थांबविण्यात येत होती. अशाप्रकारे वाहने थांबवून काम सुरु होती. अशाच प्रकारे एकवितरा हॉटेलजवळ थांबलेल्या वाहनांमध्ये सौरभची दुचाकी उभी होती. वाहने सोडण्यात आल्यानंतर निघत असतांना महामार्गाच्या खोल साईडपट्टीमध्ये दुचाकी उतरली मागे बसलेला सौरभ महामार्गावर पडला तर दुचाकीस्वार हर्षल रस्त्याच्या दुसर्या बाजूला पडला. मागून भरधाव येत असलेल्या ट्रकने महामार्गावर पडलेल्या सौरभला चिरडले. त्याचा जागीच मृत्यू झाला होता.
सौरभ चा मृतदेह पाहताच वडीलांना बसला धक्का
अपघातात बांभोरी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे कळताच महाविद्यालयाचे शिक्षक भागवत पाटील व विद्यार्थी सागर सोनवणे, पीयुष मन्यार, हर्षल सोमाणी, योगेश सोनवणे यांनी सौरभला जिल्हा रुग्णालयात हलविले. डॉ. कुरकुरे यांनी मृत घोषित केले. तर दुसरीकडे हर्षल सपकाळे हा जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. मानसिक धक्का बसू नये म्हणून त्याच्यापासून सौरभ मयत झाल्याची माहिती लपविण्यात आली होती. नातेवाईकांच्या माहितीनुसार सौरभचे वडील व आई यांनी सिव्हील गाठले. याठिकाणी सौरभचा मृतदेह पाहताच सौरभची आईसह लहान भावाने हंबरडा फोडला तर वडीलांना जबर धक्का बसला होता.
ट्रकचालक तालुका पोलिसांना शरण
अपघातानंतर नागरीक संताप, रोष करतील या भीतीने ट्रकचालक घटनास्थळाहून पसार झाला. व थेट तालुका पोलीस ठाण्यात जावून ट्रक जमा करत पोलिसांना शरण गेला. ईस्माईल भाई गनीभाई भादुला वय 35 रा. भावनगर, गुजरात असे ट्रकचालकाचे नाव आहे. उशीरापर्यंत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.