नागपूर : गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांची मदत आवश्यक असते. मात्र कधी कधी पोलीसच गुन्हेगार असतात. अशी प्रचीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात आली आहे. पोलिसांनी सिव्हिल लाईन्स परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकला आहे. या छाप्यात १२ जणांना ताब्यात घेण्यात आ;र आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये ६ पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
जुगार खेळताना पकडण्यात आलेले हे पोलीस कर्मचारी पोलीस मुख्यालय आणि शांतीनगर पोलीस स्टेशनमधील कर्मचारी आहेत. तसंच ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये तीन सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आणि इतर तीन सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे. सिव्हिल लाईन्स परिसरात विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ एक जुनी इमारत आहे. या इमारतीत हा जुगार अड्डा सुरु होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे जुगार अड्डे चालवणारा देखील एक सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आहे.
दरम्यान सर्व प्रकरणामुळे नागपूर पोलिसांची मान शरमेने खाली गेली आहे. तसंच नागपूर पोलिसांनी एक प्रसिद्धीपत्रकही जारी केलं आहे. मात्र कोणतेही वरिष्ठ पोलीस अधिकारी याबद्दल बोलायला तयार नाही.