मुख्याधिकारी मुंबईत ; दोन दिवसांनी पोलीस नोंदवणार जवाब

0

भुसावळ पालिकेतील फाईल गहाळ प्रकरण ; दोन अधिकारी सेवानिवृत्त ; उर्वरीत कर्मचार्‍यांना जवाबासाठी पोलिसांनी बोलावले

भुसावळ- शेतजमीन एन.ए.करण्यासाठी मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांच्यासह सात जणांनी तीन लाखांची खंडणी मागितली तर ती न दिल्याने आपली फाईलच पालिकेतून लांबवण्यात आल्याचा आरोप माजी आमदार संतोष छबीलदास चौधरी यांनी बुधवारी रात्री शहर पोलिसांना दिलेल्या तक्रारीद्वारे केल्यानंतर भुसावळच्या राजकीय गोटासह पालिकेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. तक्रारीच्या अनुषंगाने भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले गुरुवारी पालिकेत पोहोचले मात्र मुख्याधिकारी दोन दिवस मुंबईत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते आल्या पावल्या परतले. दरम्यान, असे असलेतरी अन्य कर्मचार्‍यांना पोलिसांनी चौकशीसाठी शहर पोलीस ठाण्यात बोलावले आहे.

खंडणी न दिल्याने फाईल लांबवल्याचा आरोप
भुसावळ नगरपालिका हद्दीतील सर्वे क्रमांक 103/1 शेतजमीन 24 ऑक्टोबर 2002 रोजी दुय्यम निबंधकांकडे नोंदणी करून माजी आमदारांनी विकत घेत शेतजमीन अकृषिक करण्यासाठी पालिकेत फाईल सादर केली मात्र उभयंतांनी फाईल मंजुरीसाठी तीन लाखांची रक्कम लाच स्वरूपात मागितल्याचा चौधरींचा आरोप आहे. पालिकेचे मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर, नगरपालिका सेवानिवृत्त अभियंता अनिल भागवत चौधरी, नगरपालिकेचे अभियंता प्रवीण जोंधळे, अभियंता पंकज पन्हाळे, नगरपालिका कर्मचारी राजू नटकर, विजयसिंग चव्हाण, लेखापाल अख्तरखान युनूसखान या सातही जणांवर चौधरी यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

पोलिसांकडून तपासाला सुरुवात
चौधरींच्या आरोपानंतर गुरुवारी सहा.निरीक्षक दीपक गंधाले कर्मचार्‍यांसह पालिकेत पोहोचले मात्र मुंबई येथील बैठकीसाठी मुख्याधिकारी गेल्याची माहिती कळाल्यानंतर ते माघारी परतले. दोन दिवसानंतर मुख्याधिकारी परतल्यानंतर आपण या तक्रारीसंदर्भात चौकशी करू, असे गंधाले यांनी सांगितले तर अन्य सहा कर्मचार्‍यांना मात्र अख्तर खान यांच्यासह अन्य कर्मचार्‍यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे ते म्हणाले.