विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रशासन विचार करेल काय ? ग्रामस्थांचा प्रश्न
चाळीसगाव- विद्यार्थीप्रिय ठरलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांची झालेली बदली रद्द करावी, या मागणीसाठी दहिवद येथील ग्रामस्थांनी माध्यमिक शाळेलाच कुलूप ठोकले होते. याप्रकरणी अद्याप कुलूप असल्याने शाळा बंद राहिली. जोपर्यंत मुख्याध्यापकांची बदली रद्द केली जात नाही, तोपर्यंत कुलूप उघडणार नाही, असा पवित्रा पालकांसह ग्रामस्थांनी घेतला आहे. विद्यार्थ्यांनी देखील हीच मागणी लावून धरलीय आहे. ाबाबत तीन दिवसांपासून शाळा व्यवस्थापनाकडून कुठलाही तोडगा काढण्यात न आल्याने सलग तीन दिवस शाळेचे कामकाज बंद राहिले. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना कुलुप पाहून घरी माघारी परतावे लागले.
ईशार्यानंतर नरमले नाही प्रशासन
तालुक्यातील दहिवद येथे राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय आहे. सकाळी 11 ते 5 वाजेदरम्यान पाचवी ते दहावीचे वर्ग भरतात. या शाळेत परीसरातील 600 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ईश्वरलाल अहिरे हे मुख्याध्यापक आहेत. त्यांच्या काळात या शाळेत अनेक सुधारणा झाल्या. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण होऊन त्यांचे अध्ययन सुधारले होते. विद्यार्थ्यांना चांगली शिस्त लागली होती. संस्थेने मुख्याध्यापक ईश्वरलाल अहिरे यांची अचानक तालुक्यातील गणेशपूर येथे बदली केली. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकार्यांची भेट घेऊन झालेली बदली त्वरीत रद्द करा, अन्यथा शाळेला कुलूप ठोकू, असा इशारा दिला होता. यासंदर्भात कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे सरपंच भीमराव पवार, उपसरपंच भीमराव खलाणे, हिंमत निकम, गोरख पवार, नितीन बागूल, दिलीप वाघ, गौरव पाटील, दिशा चिंतामण पाटील, गुलाब वाघ, जिभाऊ जाधव, संभाजी देवरे, शांताराम पवार, नवल पवार, भाईदस बोरसे, बबलू पवार, गोरख पवार, शरद पवार, अमोल वाघ, नितीन बागुल, मधुकर देवरे व पालक, ग्रामस्थांनी सोमवारी शाळेच्या प्रवेशव्दाराला कुलूप ठोकले ते आजतागायत कायम आहे.