दांडीबहादूर मुख्याध्यापकांच्या वेतनात कपात

0

उल्हासनगर : केंद्र व राज्य शासनाचा सर्व शिक्षा अभियान समावेशित शिक्षण एकदिवसीय कार्यशाळेस दांडी मारणार्‍या 97 मुख्याध्यापकांचे दोन दिवसांचे वेतन कापण्याचा आदेश उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिला आहे. अशी माहिती समन्वयक संगीता काळे-लहाने यांनी दिली.

केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सर्व शिक्षा अभियान राबवले जात असून यात अठरा वर्षाखालील शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले जाते. या संदर्भात 25 जुलै रोजी एनसीटी शाळेत सर्व शिक्षा अभियान समावेशित एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यासाठी शहरातील मनपा शाळा, खाजगी अनुदानित, विना अनुदानित, विशेष शाळा तसेच ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्यांना आमंत्रित केले होते. 212 पैकी 115 जणांनी कार्यक्रमास हजेरी लावली. तर 97 जणांनी दांडी मारली होती. यासंदर्भात मनपा आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी आदेश काढला असून दांडी मारणार्‍याचे दोन दिवसांचे वेतन कापण्याचा निर्णय घेतला आहे.