पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला केराची टोपली ; पोलीस उपअधीक्षकांनी पाठविला होता कसूरी अहवाल
जळगाव- पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी पाठविलेल्या कसूरी अहवालावरुन पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी 8 एप्रिल रोजी शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अनिल विश्वनाथ धांडे व पोलीस नाईक रविंद्र एकनाथ गुरचळ यांची पोलीस मुख्यालयात बदलीचे आदेश दिले होते. या दोघां कर्मचार्यांनी पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली असून आदेशाला 12 दिवस उलटूनही दोेघेही शनिपेठ ठाण्यातच ठाण मांडून आहेत. विशेष म्हणजे अधीक्षकांच्या आदेशानंतरही पोलीस निरिक्षकांनी दोघांना कार्यमुक्त केले नसल्याची माहिती मिळाली आहे.
पोलीस उपधीक्षकांंनी पाठविला होता कसूरी अहवाल
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी अवैधधंद्याविरोधात कारवाईचे सत्र सुरु आहे. या शहरात अनेक ठिकाणी कारवाई दरम्यान अवैधधंदे चालकासोबत त्या- त्या पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचार्यांचे संबंध असल्याचे समोर आले होते. यात शनिपेठ पोलीस ठाणे हद्दीतील शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अनिल विश्वनाथ धांडे व रविंद्र एकनाथ गुरचळ या दोघांचीही नावे समोर आली होती. पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी दोघा कर्मचार्यांना वारंवार सुचना दिल्या होत्या. मात्र त्यानंतरही धांडे व गुरचळ या दोघा कर्मचार्यांकडून अवैधधंदे सुरु ठेवण्यासाठी अवैधधंदे व्यावसायिकांना पाठबळ देण्यात आले. याबाबत डॉ. रोहन यांनी दोघा कर्मचार्यांच्या कसूरी अहवाल डॉ. पंजाबराव उगले यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार डॉ. उगले यांनी अनिल धांडे व रविंद गुरचळ या दोघांची मुख्यालयात बदलीचे आदेश दिले होते.
पोलीस निरिक्षकांनीकडूनही ‘आदेशाला खो’
पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानंतर पोलीस निरिक्षकांनी संबंधित कर्मचार्यांना एक ते दोन दिवसात कार्यमुक्त करणे गरजेचे असते. मात्र शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे यांनीही अनिल धांडे व रविंद्र गुरचळ यांना अद्यापर्यंत कार्यमुक्त केलेले नाही. आदेशानंतर दोघे कर्मचारी तीन ते चार दिवस रजेवर गेले. यानंतर पुन्हा बदलीच्या ठिकाणी हजर होणे अपेक्षित होे मात्र अद्यापर्यंत दोघेही कर्मचारी शनिपेठ पोलीस ठाण्यातच असल्याने पोलीस निरिक्षकांसह पोलीस कर्मचार्यांकडून अधिक्षकांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक करणार का कारवाई?
तत्कालीन पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी अवैधधंद्याना पाठबळ देणार्या काही पोलीस निरिक्षकांना तसेच कर्मचार्यांची मुख्यालयात बदली केली होती. अधीक्षक डॉ. उगले यांच्या आदेशानंतरही पोलीस निरिक्षकांनी धांडे व गुरचळ या दोघांना कार्यमुक्त का केले नाही? दोघेही कर्मचार्यांना विठ्ठल ससेंकडून का पाठीशी घातले जातेय? असे प्रश्न उपस्थित होत असून सर्व पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांमध्ये कुजबूज सुरु आहे. सर्वांना समान न्याय याप्रमाणे पोलीस अधीक्षक दोघा कर्मचार्यांसह आदेशानंतरही त्यांना कार्यमुक्त न करणार्या पोलीस निरिक्षकांवर कारवाई करतील काय? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.