मुख्य सूत्रधाराच्या अटकेसाठी मंत्री गिरीश महाजन मुर्दाबादच्या घोषणा

0

वाकडी येथील ग्रा.पं.सदस्याचा मृतदेह पाचोरा तालुक्यातील विहिरीत आढळला

पहूर ता.जामनेर/ जळगाव : जामनेर तालुक्यातील वाकडी येथील विनोद लक्ष्मण चांदणे या दहा दिवसांपासून बेपत्ता ग्रामपंचायत सदस्याचा मृतदेह गुरुवारी पाचोरा तालुक्यातील मोहाडी शिवारात मृतदेह आढळून आला. या प्रकारानंतर संतप्त चांदणे नातेवाईकांसह वाकडी येथील समाजबांधवांनी जिल्हा रुग्णालय गाठून जोपर्यंत याप्रकरणात मुख्य सूत्रधार चंद्रशेखर वाणीस अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा घेतला. महाराष्ट्र काँग्रेस कमेटीचे अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय आंबोरेही यांनी पोलीस अधीक्षकांची भेट राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर काही तासातच पंढरपूर येथील चंद्रशेखर वाणी यास अटक करण्यात आली. अटक झाल्याची खात्री झाल्यावर तब्बल चार तासानंतर समाजबांधवांनी मृतदेह ताब्यात घेतला. अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा रुग्णालयात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

वाकडी ग्रामपंचायत सदस्य विनोद लक्ष्मण चांदणे 19 मार्चला सकाळी नऊपासून संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना घडली. कुटुंबीयांनी शोध घेत अखेर मिळून येत नाही म्हणून भाऊ विजय लक्ष्मण चांदणे याच्या तक्रारीवरून 23 मार्च रोजी माजी सरपंच चंद्रशेखर पद्माकर वाणी, महेंद्र श्यामलाल राजपूत (वय 28), विनोद सुरेश देशमुख (वय 37), नामदार गुलाब तडवी (वय 35) या चौघांविरुद्ध अपहरण घातपात केल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यात डीवायएसपी ईश्‍वर कातकाडे यांच्यासह पथकाने महेंद्र राजपुत, विनोद देशमुख, नामदार तडवी अशा तिघांना अटक केली असुन प्रमुख सुत्रधार चंद्रशेखर वाणी फरार होता.

तक्रारीची दखल न घेतल्याने विनोद खून
ग्रा.पं.सदस्य विनोद चांदणे यांनी माहिती अधिकारात ग्रा.पं.तील भ्रष्टाचार उघड केला होता. याचा राग आल्याने चंद्रशेखर वाणीसह विनोद देशमुख यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकारासह वाणीच्या गावातील दहशतीबाबत चांदणे यांनी मुख्यमंत्र्यासह सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाव्दारे तक्रार केली होती. मात्र तरीही त्याची यंत्रणेकडून दखल घेण्यात आली. दखल घेतली असती तर संबंधितांवर कारवाई होवून चांदणे यांची जीव वाचला असता. वाणी यानेच चांदणे याचा खून केल्याचे स्पष्ट झाले माऋ मंत्री महाजनांचा वरदहस्त असल्याने यंत्रणा दबावाखाली काम करत त्यामुळे वाणीस मृतदेह सापडल्यानंतरही अटक होत नसल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत मयत चांदणे यांचा भाऊ राजेंद्र चांदणे यांनी केला. वाकडी येथील नग्न मुलांची धिंड प्रकरणातही वाणीचा हात होता, मात्र त्यावेळी मंत्री महाजनांनी त्याला वाचविल्याचेही यावेळी राष्ट्रीय लहूसेनेचे अध्यक्ष रमेश कांबळे यांनी सांगितले. परिषदेला रामचंद्र मोरे, लहूजी संघर्ष सेनेचे युवाध्यक्ष स्वप्निल सपकाळे, सुरेश आंभोरे, लहुजी सेनेचे राज्य संघटक रामचंद्र मगरे, मातंग संघर्ष समितीचे सल्लागार डी.बी.खरात, बहुजन रयत परिषदेचे प्रकाश बोसले, नाना भालेराव आदी उपस्थित होते.

चार तास समाजबाधवांचा जिल्हा रुग्णालयात ठिय्या
पिंपळगाव हरेश्‍वर पोलीस स्टेशन हद्दीत मोहाडी शिवारातील एका शेतकर्‍याने त्याच्या शेतातील विहिरीत मृतदेह असल्याचे तत्काळ पोलिस पाटलांना कळवले. त्यानुसार गुरुवारी सकाळी अप्पर अधिक्षक प्रशांत बच्छाव, डीवायएसपी ईश्‍वर कातकाडे, डीवायएसपी केशव पांतोंड यांच्या उपस्थीतीत मृतदेह बाहेर काढण्यात आला. तो मृतदेह बेपत्ता विनोदचा असल्याचे मयताचा भाऊ राजु चांदणे याने ओळखला. यानंतर शवविच्छेदनासाठी शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह पाठवण्यात आला. माहिती मिळाल्यानंतर दुपारी 1 ते दीड वाजेच्या सुमारास समाजबांधवही दाखल झाले. यावेळी मूख्य सूत्रधार वाणी यास अटक करा, अन्यथा मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा घेतला. चार तास समाजबांधव ठाम होते. यानंतर आरोपीला अटक झाल्याची पोलीस अधीक्षकांशी फोनवर बोलून खात्री झाल्यावर 7.30 वाजेच्या सुमारास नातेवाईकांसह समाजबांधवांनी मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी जिल्हा रुग्णालयता दंगा नियंत्रण पथक, जिल्हापेठ पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखेसह अधिकारी कर्मचार्‍यांचा बंदोबस्त तैनात होता.

मंत्री महाजनांच्या विरोधात मृदाबादच्या घोषणा
महाराष्ट्र काँग्रेस कमेटी अनुसूचित जाती जमातीचे प्रदेशाध्यक्ष विजय आंभोरे हे जिल्हा दौर्‍यावर होते. प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी शिष्टमंडळासह पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. संशयितास तातडीने अटक करा, अन्यथा उद्यापासून राज्यभर आंदोलन करण्यात येतील असा इशारा दिला. यानंतर आंभोरे यांनी जिल्हा रुग्णालयात समाजबांधवांची भेट घेवून माहिती जाणून घेतली. त्याच्यासोबत डॉ. उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, शहराध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी उपस्थित होेते. यावेळी समाजबांधवासह कॉग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा निषेध करत मंत्री महाजन मुर्दाबाद, चंद्रशेखर वाणी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. या घोषणांनी जिल्हा रुग्णालय दणाणले होते.

अटकेतील संशयितांना 1 पर्यंत कोठडी
या प्रकरणातील मुख्य सुत्रधार माजी सरपंच शेखर वाणी याच्या अटकेसाठी काल पहूर पोलीस ठाण्यावर मातंग समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले होते .आज अखेर त्यास विशेष पथकाने जेरबंद केले .23 रोजी अटक करण्यात आलेल्या महेंद्र शामलाल राजपूत , विनोद सुरेश देशमुख आणि नामदार गुलाब तडवी यांना न्यायालयापुढे त हजर करण्यात आले असता त्यांना1 एप्रील पर्यंत पोलीस कोठडी सुणावण्यात आली . सदर प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे , पोलीस उपअधिक्षक केशव पातोंड , सहाय्यक पोलीस निरीक्षक दीलीप शिरसाठ करीत आहेत