मुग्धा वाव्हळने पटकविले कास्य पदक

0

शहरातून होत आहे कौतुक

पिंपरी : नुकत्याच इजिप्त येथे झालेल्या युआयपीएम बायथल आणि ट्रायथल 2018 वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये मुग्धा वाव्हळने जागतिक पातळीवरील स्पर्धांमध्ये पदक पटकविल्याने परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या विद्यार्थिनीच्या गटाने मेडल पटकावले. जागतिक पातळीवरील बायथल आणि ट्रायथल स्पर्धांमध्ये भारतीय संघात पिंपरी-चिंचवड शहराच्यावतीने प्रतिनिधित्व करणारी मुग्धा वाव्हळ ही सिटी प्राईड स्कूल, निगडी या शाळेतील इयत्ता आठवीची एकमेव विद्यार्थिनी आहे. ट्रायथलमध्ये ब्रॉन्झ मेडल विजेत्या पंधरा वर्षांखालील मुलींच्या गटात पुण्याची अनन्या नामदे आणि मंचरची सायली गांजळे या विद्यार्थिनींचा समावेश होता. इजिप्त येथे झालेल्या स्पर्धांमध्ये सुमारे सत्तावीस देश सहभागी झाले होते. यात भारतीय संघात नऊ ते एकोणीस या वयोगटातील बावीस खेळाडूंचा सहभाग होता. बालेवाडी येथे झालेल्या नवव्या मॉडर्न पेंटॅथलॉन राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील कामगिरीनुसार भारतीय खेळाडूंची निवड करण्यात आली होती. ऑलिंम्पिक स्पर्धांच्या नियम आणि निकषांवर घेण्यात आलेल्या बायथले आणि ट्रायथले स्पर्धांमध्ये चारशे मीटर धावणे, पंचवीस मीटर पोहणे याच्या चार फेर्‍या आणि नेमबाजीच्या पाच फेर्‍यांचा समावेश असतो. एकूण सोळाशे मीटर धावणे, शंभर मीटर पोहणे आणि नेमबाजीचे पाच शॉटस् शिवाय चार वेळा लेझर शुटिंग असे स्पर्धेचे स्वरूप असते.

पाच तासांचा क्रीडा सराव

याबाबत अधिक माहिती देताना मुग्धाचे वडील महेश वाव्हळ यांनी सांगितले की, स्पर्धात्मक खेळांमध्ये सहभागी होण्याचा कोणताही वारसा आमच्या घरात नव्हता. परंतु वयाच्या पाचव्या वर्षापासून मुग्धाची खेळातील आवड आणि नैपुण्य लक्षात आल्याने आम्ही तिला विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास उद्युक्त केले. स्थानिक, जिल्हा आणि राज्य पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये तिने पारितोषिके मिळवली. गेल्या वर्षी स्पेनमध्ये झालेल्या बायथल आणि ट्रायथल जागतिक स्पर्धांमध्ये तिला भारतीय संघातून प्रतिनिधित्व करता आले. ऑलिंम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न पाहणारी मुग्धा दररोज किमान पाच तास क्रीडासरावासाठी वेळ देते. इजिप्त येथील स्पर्धेतील यशामागे जितेंद्र खासनीस यांचे प्रशिक्षण आणि सुरेश काकड, प्रवीण यादव यांचे मार्गदर्शन तसेच सिटी प्राईड स्कूल-निगडीच्या मुख्याध्यापिका माया सावंत यांचे सहकार्य अतिशय मोलाचे ठरले.