पुणे । मुठा नदी सुधार योजनेसाठी येत्या महिनाभरात सल्लागार नेमला जाईल, अशी माहिती भाजपच्या नेत्यांनी जनशक्तिशी बोलताना दिली.
या योजनेसाठी केंद्र सरकारने सुमारे 900 कोटी अनुदान मंजूर केले आहे. यातून सांडपाणी निचरा प्रकल्प आणि नदी प्रवाह अधिक प्रवाही करणे, ही कामे प्रामुख्याने केली जाणार आहेत. पर्यावरण खात्याचे मंत्रीपद असताना प्रकाश जावडेकर यांनी योजना मंजूर करून घेतली. सल्लागार नेमल्याशिवाय कामांची निविदा प्रक्रिया सुरू होऊ शकत नाही. याकरिता जावडेकर यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यात महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि अन्य पदाधिकार्यांशी चर्चा केली. येत्या महिनाभरात सल्लागार नेमणूक होईल असे जावडेकर यांनी सूचित केले असे समजते. या योजनेखेरीज नदी सुशोभीकरण प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. दोन्ही योजनांसाठी अडीच हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. पाचशे कोटींचा एक टप्पा याप्रमाणे चार टप्प्यात प्रकल्प पूर्ण करण्याचा आराखडा आहे.