मुडी येथील ग्रामविकास संस्था अध्यक्षाची निवड बेकायदेशीर

0

अमळनेर । तालुक्यातील मुडी येथील ग्राम विकास संस्थेत प्रभारी अध्यक्षपदाची तरतुद नसतांना तसेच प्रभारी अध्यक्ष निवडीसाठी सर्वसाधारण सभेची मान्यता नसतांनाही संचालकांनी प्रभारी अध्यक्षपदी पंजाबराव पांडुरंग सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड बेकायदेशीर असल्याचे सांगत संस्थेतील बदल्या, पदोन्नती, समायोजनाची कामे बेकायदेशी होत असल्याचे आरोप संस्थेचे पदसिध्द सदस्य उदय नारायण पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयात फेरफार नोंदी न करता ही निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शासनाची कुठलीही परवानगी नसतांना अनधिकृतपणे पैसे गोळा करुन मुडी येथे शाळेच्या प्रांगणात स्व.विनायक दादा पाटील यांचा पुतळा बसविला जात असल्याचा आरोपही त्यांनी केले आहे. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी अमळनेर व मारवड पोलिस स्टेशनला लेखी पत्र देऊन कारवाईची मागणी केली आहे.

नियमाचे उल्लंघन
घटनेप्रमाणे शाळेतील उपशिक्षकांना पदोन्नती, नियुक्ती,समायोजन,बदली करायची असल्यास त्यांच्या आदेशावर महाराष्ट्र एम्प्लॉइझ प्रायव्हेट स्कुल ऍक्ट 1981 मधील नियम 9 नुसार संस्थेचे अध्यक्ष यांची पदोन्नती, पेंशन प्रस्ताव व नियुक्तीवर अध्यक्ष यांची स्वाक्षरी असणे अनिवार्य आहे. मात्र प्रभारी अध्यक्ष निवडतांना नियमाचे उल्लंघन करण्यात आले आहे.

पदसिद्ध अध्यक्षांना डावलले
ग्राम विकास शिक्षण संस्थेची निवडणूक प्रक्रिया 2015 मध्ये पार पडली. या निवडणुकीत विजयी होवून अध्यक्ष पदी उदय नारायण पाटील यांची वर्णी लागली होती. धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे अधीक्षक यांनी त्यांना अधिकृत निवडीचे प्रमाणपत्र दिले आहे. मात्र प्रभारी अध्यक्ष निवड करतांना पदसिध्द अध्यक्ष उदय पाटील यांना डावलण्यात आले आहे. निवडणूक झाल्यापासून संस्थेचे कायम संचालक रमेश विनायक पाटील व सचिव सुनील पंढरीनाथ पाटील हे परस्पर संचालक मंडळाची बेकायदेशीर बैठका घेवून बेकायदेशीर शिक्षकांच्या बदल्या करीत आहेत.

कार्यकारी मंडळाने माझी तज्ञ संचालक असल्याने सर्वानुमते निवड केली आहे. संस्थेतील सर्व निर्णय कार्यकारी मंडळाने सर्वानुमते घेतले आहेत. संस्थेचा चेअरमन मुडी या गावाचाच असेल, अशी तरतूद करण्यात आली आहे. उदय पाटील यांनी संस्थेविरुद्ध कृत्य केल्याने त्यांना पदावरून दूर केल्याने त्यांना अध्यक्षपद हे बेकायदेशीर म्हणण्याचा अधिकार नाही. यासंदर्भात धर्मदाय आयुक्त योग्य तो निर्णय घेतील.
– पी.पी.सूर्यवंशी, प्रभारी अध्यक्ष