मुतारीवरील अतिक्रमणे काढा

0

नवापूर । नवापूर शहरात असलेल्या बाजार पेठ ही दिवसेंदिवस लोकसंख्येच्या दृष्टीेने वाढत असून शहरात गर्दीचे प्रमाण वाढत आहे. अशा परीस्थितीत बाजारात व्यापारी आपली दुकाने चालवून दिनचर्या चालवित आहे. तसेच बाजार पेठ असल्यामुळे ग्राहकांचीही मोठी वर्दळ असते. मात्र गेल्या अनेक वर्षापासून शहरातील मुलभूत सुविधांचा आभाव होत असून मुतारीच्या जागेवर अतिक्रमण करून दुकान काढण्यात आले असल्याने बाजारात येणार्‍या जाणार्‍या ग्राहकांसह व्यापारी मंडळींना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सदरील अमितक्रमण काढून मुतारी बांधण्यात यावी याबाबत शहर व्यापारी व ग्राहक संघर्ष समितीने मुख्याधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

अतिक्रमण काढून मुतारी न बांधल्यास आंदोलन करण्याचा इशारा
नवापूर शहरातील बाजार पेठ ही दिवसे दिवस दाट लोकसंख्येची व प्रचंड गर्दीची होत चालली आहे. अशा परिस्थितीत बाजारात व्यापारी आपली दुकाने चालवून आपली दिनचर्या चालवित आहे, आपल्या आवश्यक वस्तूची खरेदी करण्याकरीता पुरूष, महिला, बालके, वयोवृद्ध नागरिक शहर तालुक्यातून मोठ्या संख्येने बाजारपेठेत येत असतात तसेच संपूर्ण दिवस लोकांना घराबाहेर आवश्यक असल्याने अशा वेळी दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या नैसर्गिक सोयीसुविधा जसे आरोग्यप्रत दर्जात्मक शौचालय व मुतारीची उपलब्धता अनिवार्य असते. परंतु नगरपरिषदेकडून शहरातील बाजारात कुठे ही या सोयीची उपलब्धता करून देण्यात आलेली नाही. नवापूर शहराच्या मध्यभागी पुरातन वास्तू गढी असुन तेथील एका कोपर्‍यात जशी तशी एक मुतारी होती, परंतु तेथे एका व्यक्तीने जबरीने अतिक्रमण करून सदर जागा बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. या व अशा प्रकारच्या अतिक्रमणांना नवापूर नगर परिषदेकडून कुठेही विरोध होतांना दिसत नाही. तरी अशा अतिक्रमणधारकांना नगरपरिषद कार्यालयाचे प्रोत्साहन आहे काय? असा सवाल संघर्ष समितीने निवेदनात केला आहे.

सदर मुतारी ही जनतेस जशी तशी मदत पुरवित आहे. तरी येथील अतिक्रमण सात दिवसाचा आत काढून तेथे एक दर्जात्मक मुतारी निर्माण करण्यात यावी. तेथे झालेल्या अतिक्रमणास शहरातील नागरिकांचा विरोध असून सर्वानुमते विरोध दर्शविण्यात आला आहे. जनतेच्या हाल आपेष्टा लक्षात घेता कार्यवाही वेळेत न झाल्यास सर्व अतिक्रमण धारकांचा विरोधात जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदन स्विकारण्यासाठी जबाबदार व्यक्ती गैरहजर
सदरचे निवेदन नगर पालिका कार्यालयात कार्यालयीन वेळेत देण्यास आमचे शिष्टमंडळ गेलो असता पालिकेच्या मुख्याधिकारी व कार्यालयीन अधीक्षक हे जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे निवेदन कोणाला द्यायचे याबाबत गोंधळ निर्माण झाला होता. अखेर पालिकेचे आरोग्य निरीक्षक भरत पाटील यांना निवेदन दिले, असे नवापूर शहर व्यापारी व ग्राहक संघर्ष समितीने निवेदनात म्हटले आहे.

मुतारी नसल्याने ग्राहकांची गैरसोय
नवापूर शहरातील मुख्य बाजारपेठ भागात पालिकेची एक ही मुतारी नाही. जे नवीन शॉपीग सेटर बांधण्यात आले, त्यात ही मुतारीची सोय करण्यात आली नसल्याने तालुक्यातून बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या पुरूष व महिलांना शौचास जाण्यासाठी फारच अडचण होते. मुतारी नसल्याने कुठे ही मोकळ्या जागी, शहरातील कोणालाही घराचा बाजूस मोकळ्या जागी शौचास बसण्याचे प्रकार पाहायला मिळतात. यावरून अनेक भागात भानगडी होतात तसेच लज्जा ही निर्माण होत असते अशामुळे शहराचे मानसिक व शारीरिक आरोग्य देखील बिघडत चालले आहे. नगर पालिकेने शहरात व प्रत्येक शॉपीग सेटर येथे मुतारीची सोय करावी अशी मागणी करण्यात येत आहे. निवेदनात राहुल मराठे, गायञी टेलर, पंतु गावीत टेलर, रामकृष्ण गिरासे, संजय पाटील, जयेश प्रजापत, पिंटू भावसार यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.