मुदतबाह्य औषधी ; भुसावळातील मेडिकल चालकाचा 61 दिवसांचा परवाना निलंबित

0

भुसावळ- नवजात अर्भकाला मेडिकलमधून मुदतबाह्य औषधी दिल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर तक्रारदाराने अन्न व औषध प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीनंतर शहरातील शिवाजी महाराज संकुलाजवळील गणेश मेडिकल स्टोअर्सचा 61 दिवसांसाठी परवाना निलंबित करण्यात आल्याने औषध दुकान बंद करण्यात आले आहे. शहरातील वैशाली राहुल आराक यांना प्रसुतीसाठी उंट मोहल्ल्यातील डॉ.भोलाणे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 1 फेब्रुवारी 2018 रोजी त्यांची प्रसुती झाल्यानंतर नवजात अर्भकासाठी डॉक्टरांनी प्रिस्क्रीप्शनवर लिहून दिलेली औषधी श्री गणेश मेडिकलमधून खरेदी करण्यात आली मात्र ही औषधी मुदतबाह्य असतानाही ती विक्री करण्यात आली शिवाय अर्भकाला त्याचा त्रास जाणवल्याने वैशाली आराक यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे 31 मार्च 2018 रोजी लेखी तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त जाधव यांनी 17 ऑक्टोबर ते 16 डिसेंबर 2018 दरम्यान 61 दिवसांसाठी औषध दुकानाचा परवाना निलंबित केल्याने दुकानाला कुलूप लावण्यात आले आहे. या कारवाईमुळे औषध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.