मुदतबाह्य बियाण्यांची विक्री करुन शेतकर्‍यांची फसवणूक

0

बोदवड । सध्या पावसाळा सुरु झाला असल्याने सर्वत्र पेरणीचे काम सुरु आहे. यासाठी शेतकरी बियाणे खरेदी करीत असून याचा गैरफायदा घेऊन काही कृषी केंद्र चालक हे मुदत संपलेले बियाणे विक्री करुन शेतकर्‍यांची फसवणूक करीत आहे. येथील बियाणे विक्रेत्याने मुदतबाह्य कपाशीचे बियाणे ‘सुपरस्टार प्लस’ अनेक शेतकर्‍यांना विकून शेतकर्‍यांची फसवणूक केली असल्याचे वृत्त आहे.

800 रुपये किंमतीचे बियाणे 740 रुपयांत
बोदवड-नाडगाव रोडवर असलेल्या कृषी केंद्र चालकाचे तालुक्यातील जामठी येथेही कृषी केंद्र आहे. त्या कृषी केंद्रावर पैसे कमविण्यासाठी बोगस बियाणे, कालबाह्य झालेले बियाणे विकून शेतकर्‍यांची फसवणूक करीत असल्याचे शेतकरी योगेश तेली यांना सुपर स्टार प्लस हे बियाणे कपाशीचे आहे. त्याची किंमत बॅगवर 800 रुपये आहे. परंतु महावीर ट्रेडर्सचे मालक खिवसरा यांनी त्यांना फक्त 740 रुपयांत विकली. त्यामुळे खरेदी किंमतीपेक्षा कमी भावात विकण्याचा उद्देश शेतकर्‍यांनी लक्षात घ्यायला हवा.

शेतकर्‍यांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता
कोणत्याही व्यापार्‍याकडून बी-बियाणे खरेदी करतांना पक्के बिल घ्यावे, जे बियाणे किंवा खत घेतले त्याच्या बॅगवर किती किंमत आहे ते तपासून दुकानदार कितीमध्ये आपल्याला देतो याचा विचार करुनच बियाणे घ्यायला हवे. छापील किंमतीपेक्षा जास्त भावात दुकानदार विकत असेल तर त्याची तक्रार कृषी अधिकार्‍याकडे करायला पाहिजे.

फसवेगिरी थांबवावी
जे कृषी केंद्रधारक असे करत असतील त्यांचे लायसन्स रद्द केले जातात. याची जाणीव शेतकरीवर्गाने ठेवायला पाहिजे, या कृषी केंद्र चालकाने अनेक शेतकर्‍यांना मुदतबाह्य बियाणे विकले असल्याचे समजते. ज्या शेतकर्‍यांनी याचे बिंग फोडले त्यांच्या बॅगा बदलवून दिल्याचे खिवसरा यांनी दुरध्वनीवर सांगितले आहे. परंतु त्यांनी बियाणे नेवून शेतात पेरले त्यांचे काय? जर शेतात कपाशी आली नाही तर केंद्रचालक त्यांना होणार्‍या उत्पन्नाइतके खर्च देतील का? असा संतप्त सवाल शेतकरीवर्गाकडून केला जात आहे. त्यामुळे अशा फसवेगिरी केंद्रचालकांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.