मुदत वाढवा नाहीतर दंगल होईल!

0

मुंबई : पीक विमा भरण्यासाठी मुदत कमी असल्याने आणि सर्व्हर डाऊनसारख्या समस्या असल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत असून या अव्यवस्थेमुळे दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून मुदतवाढ व मृत शेतकऱ्याला मदत देण्याच्या मागण्यावरून विधानसभेत जोरदार गदारोळ झाला. विधानसभेच्या कामकाजला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांनी नियम 57 अन्वये स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चेची मागणी केली होती. मुदत वाढवा अन्यथा राज्यात दंगल होईल असे सांगत या मागणीसाठी विरोधी पक्षातील सदस्यांसह शिवसेनेचे सदस्य देखील आक्रमक झालेले दिसून आले. पीक विमा मुदतवाढीसाठी सकारात्मक असून मुदतवाढ मिळाली नाही तर दिल्लीला जाऊ, असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर गोंधळ थांबला. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासापुर्वी सर्व पक्षीय आमदारांनी पीक विम्याबाबत आक्रमक होऊन चर्चेची मागणी केली. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आ. अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक सदस्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले.

आधी आपले विमे उतरावे लागतील :- अजित पवार
पिकविम्याच्या रांगेत शेतकरी मरायलेत, आता पिकविम्याच्या आधी आपले विमे उतरावे लागतील. नोटबंदीच्या काळात नागरिकांना पंतप्रधानांना आवाहन करुन सांगितले होते की ही जीवनातील शेवटची रांग असेल, मग आता शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी रांगेत का उभे राहावे लागते. दोन शेतकऱ्यांचा रांगेत मृत्यू झाला आहे. रांगेतील शेतकऱ्यांना लाठ्या का मारल्या जात आहेत ? हे मोगलाईचे सरकार आहे का ? असा परखड सवाल राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी विचारला. पवार म्हणाले, आम्ही परवा कर्जमाफीच्या चर्चेवेळी पीक विमा मुदत वाढ देण्याची मागणी केली होती. पिक विमा भरताना नांदेड जिल्ह्यातील शेतकरी रामा लक्ष्मण पोतरे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. 21 तासानंतर त्याचे पोस्टमार्टम झाले.या शेतकऱ्याचा काय दोष त्याचे वय 35 आहे. त्याचे कुटंबियाचे काय ? त्या शेतकऱ्याच्या कुटूंबियाला दहा लाख रूपये मदत द्या, अशी मागणी पवार यांनी केली.

विमा कंपन्यांचाच फायदा:- विखे पाटील
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील चर्चेची मागणी करताना म्हणाले, शेतकऱ्यांच्या रांगा बँकेसमोर लागलेल्या आहेत. हा प्रश्न गंभीर आहे. पिक विम्याच्या अगोदर शेतकऱ्यांना स्वताचा विमा उतरवावा लागेल. गेल्या वर्षी राज्यातील 1 कोटी दहा लाख शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता. शेतकऱ्यांनी 3 हजार 947 कोटी रूपये विम्या पोटी भरले. बाकीची रक्कम राज्य सरकारने व केंद्रांनी भरले. मात्र, एक हजार 729 कोटी विम्या पोटी मिळाले, म्हणजे कंपन्यांनी 2200 कोटी रूपये कमवले आहेत. शेतकऱ्यांची लुट झाली आहे. आणि आता शेतकऱ्यांना रांगेत उभे राहावे लागत आहे. सर्व्हर डाऊन होतो, हे सरकारचे अपयश असल्याची टीका करत चर्चेची मागणी केली. यावेळी सर्वपक्षीय आमदारांनी चर्चेची मागणी करत पीक विमा भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केली. आ. दिलीप वळसे पाटील, सुभाष साबणे आणि भीमराव धोंडे यांनी सहभाग घेतला.

विमा कंपन्यांचा झोल
गेक्या वर्षी ज्यांनी विमा भरला त्यांना विमा भेटला नाही आणि ज्यांनी भरला नाही तुअन्न भेटला. विमा कंपन्या आपल्या फायद्यासाठी झोल करतात. या मध्ये सुसूत्रता आणावी लागणार आहे. मुदत नाही वाढली तर दंडल उसळेल, असे सदस्य डॉ जयप्रकाश मुंदडा यांनी सांगितले. भीमराव धोंडे यांनी चारच दिवस मुदत असल्याने हा गोंधळ झालाय आणि 31 नंतर मुदत दिल्यास 31 आढसाहेच निकष लागतील का? असा प्रश्न उपस्थित केला.

रांगेत मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला ५ लाखाची मदत
या चर्चेला उत्तर देताना कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी रांगा लागल्याची कबुली देत रांगेत मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला 5 लाखाची मदत घोषित केली. फुंडकर यावेळी म्हणाले की, मराठवाड्यात बॅंकापुढे रांगा लागल्या आहेत. केंद्राच्या निकषाप्रमाणे योजना राबविली जातेय. या निकषात दोष आहेत. विमा कंपन्यांशी करार करताना 31 जुलै तारीख निश्चित केली होती. विमा करारातील दोष काढण्याचा प्रयत्न सुरु अाहे. केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. तीनदा केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आहे. १५ ऑगस्ट पर्यंत मुदत वाढीची मागणी केली आहे.मुदतवाढीसाठी केंद्राकडे धरणे धरु, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले. पीक विम्याचे निकष कायम राहतील. कंपन्यांना सरकारचे निर्देश मान्य करावेच लागेल. अन्यथा राज्य सरकार जबाबदारी घेईल, असे कृषिमंत्री म्हणाले.

पीकविमा मुदतवाढीचा सकारात्मक निर्णय होईल. नाही झाले तर आम्ही दिल्लीला जाऊन पाठपुरावा करु. पिकविमा मुदतवाढीचा सकारात्मक निर्णय दुपारपर्यंत होईल. नाही झाले तर मी स्वतः दिल्लीला जाईल.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री