जळगाव। महानगरपालिका मालकीच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांनी शनिवारी माजी आमदार सुरेश जैन यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी गाळेधारकांनी जैन यांना गाळेप्रकरणी न्याय देण्याची विनंती करण्यात आली. यावर सुरेश जैन यांनी गाळेधारकांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले. जैन यांनी गाळेप्रकरणी तात्काळ महापौर नितिन लढ्ढा यांच्याशी फोनवरुन संपर्क साधत गाळेधारकांसमोरच चर्चा केली असल्याची माहीती खुद्द महापौर लढ्ढा यांनी पत्रकारांना दिली.
18 व्यापारी संकुलाची मुदत झाली समाप्त
महानगरपालिका मालकीच्या 18 व्यापारी संकुलांची मुदत 31 मार्च 2012 साली समाप्त झाली आहे. यानंतर तात्कलीन आयुक्त संजय कापडणीस यांनी 81 ब ची प्रक्रीया राबवत काही गाळ्यांना सिल केले होते. परंतु, ही प्रक्रीया शासनाने हस्तक्षेप केल्याने थांबविण्यात आली होती. या प्रकरणात जळगाव फर्स्टचे समन्वयक डॉ. राधेश्याम चौधरी यांनी महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे गाळे ताब्यात घ्यावे, अशी जनहित याचिका दाखल केली होती. फुले मार्केटसह चार मार्केटच्या मालकीबाबत आणि अटीशर्तीचे भंग केल्यामुळे व्यापारी संकुलांची जागा ताब्यात का घेऊ नये? यासाठी जिल्हाधिकार्यांनी बजावलेल्या नोटीसच्या विरोधात स्थायी सभापती डॉ. वर्षा खडके, माजी स्थायी सभापती नितीन बरडे आणि माजी उपमहापौर सुनील महाजन यांनीही याचिका दाखल केली होती. या सर्व याचिका एकत्र करीत औरंगाबाद खंडपीठात 14 जुलै 2017 रोजी कामकाज होऊन गाळे ताब्यात घेण्याची प्रकिया राबविण्याचा निकाल दिला आहे. हायकोर्टाच्या निकालाच्या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनाकडून गाळे ताब्यात घेण्याची तयारी करण्यात येत आहे.
महापौरांशी केली चर्चा
महात्मा फुले मार्केटमधील गाळे कराराची मुदत संपलेल्या गाळेधारकांच्या शिष्टमंडळाने सुरेश जैन यांची भेट घेवूने गाळे ताब्यात घेण्याच्या कारवाईबाबत मार्ग काढण्याचे साकडे घातले. तसेच याबाबत महापौर नितिन लढ्ढा यांच्याशी याबाबत चर्चा करण्याची विनंती केली. सुरेश जैन यांनी महापौर लढ्ढा यांना गाळेधारकांसमोरच फोन लावून गाळेधारकांची भूमिका सांगीतली. गाळेधारकांना या प्रकरणी कायदेशीर बाजूला धक्का न लागता संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शासनस्तरावर जलसंपदामंत्री गिरीष महाजन, माजी महसुलमंत्री एकनाथराव खडसे यांच्यासोबत कधीही बैठक झाल्यास तेथे येण्याची तयारी दर्शविल्याचे सांगीतले.